या महाराष्ट्र राज्याला एक ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे.थोर संत,महात्मे, विचारवंत महानायक याच भूमीने दिलेले आहेत.त्यात शिवछत्रपतींच्या किर्तीचा इतिहास जगाला ज्ञात आहे. राजमाता जिजाऊ यांचे कार्य,तथा स्वराज्यांच्या संकल्पक, त्यातून स्वराज्य स्थापक शिवछत्रपती शिवाजीराजे भोसले आणि स्वराज्य टिकवून ठेवणारे राजपुत्र स्वराज्यशासक संभाजी राजे भोसले यांच्या प्रेरणादायी किर्तीची छाप या महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या जगावर पडलेली आहे.
आज १४ मे हा स्वराज्यशासक संभाजीराजे भोसले यांचा जन्म दिवस त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाश माझ्या लेखनीतून टाकत आहे.
छत्रपती संभाजी हे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले सुपुत्र. त्यांच्या आईचे नाव राणी सईबाई होते. १४ मे १६५७ ला राजपुत्र संभाजींचा जन्म पुरंदर गडावर झाला. पण लवकरच संभाजींचे मातृछत्र हरवले. राणी सईबाईचा ५ सप्टेंबर १६५९ ला मृत्यू झाला. राजमाता जिजाऊने त्यांचे संगोपन केले.आणि इथूनच एक नाही तर दोन छत्रपती घडत गेले.
जिजाऊने शंभूराजेना सर्व प्रकारचे शिक्षण दिले. तर १६६६ मध्ये वयाच्या नवव्या वर्षी संभाजी वडिलांच्या सोबत आग्र्याला गेले. एवढेच नाही तर वयाच्या चौदाव्या वर्षी ‘बुधभूषण’ नावाचा संस्कृत ग्रंथ लिहायला सुरुवात केली. तसेच वयाच्या सतराव्या वर्षी तो पूर्णही केला. याशिवाय भोजपुरी भाषेतही ‘सात सतक’, नखशिखा’ आणि ‘नायिकाभेद हे महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले.
संभाजी महाराज एक महान भाषा पंडीत होते.याशिवाय त्यांना प्रत्येक प्रांताच्या भाषा अवगत होत्या. याबाबत काही देशी परदेशी इतिहास अभ्यासकांच्या मते शंभूराजांना इंग्रजी, स्पँनिष, फ्रेंच, पोर्तुगीज, डच, हिब्रू,फारशी आणि उर्दू भाषेचे त्यांना ज्ञात होते.
त्यामुळे त्यांनी एवढ्या कमी वयात अनेक भाषातील राजकीय, सामाजिक, धार्मिक,भौगोलिक, साहित्यिक, तांत्रिक, मांत्रिक,आणि शास्त्रीय ग्रंथांचे भरपूर वाचन केले.
हे ग्रंथ बहुभाषिक होते. त्यात जैन,बौध्द, लोकायत कालीन ग्रंथाचाही समावेश होता. यावरून संभाजीराजेंना ब्राम्ही,पाली व प्राकृत भाषेचाही गाढा अभ्यास होता. त्यात जैन साहित्यातील ‘षड्दर्शन समुच्चय’ हा ब्राम्ही भाषेतील ग्रंथ आहे. बौध्द साहित्यातील ‘त्रिपीटक’ हे पाली भाषेत आहे.
संभाजी राजेंनी ‘बुधभूषण’ हा महान पवित्र आणि धीरोदात्त संस्कृत ग्रंथ लिहिला. याचे अनन्यसाधारण साधारण महत्व आहे.त्याची विशेषता सांगताना असे म्हणतात की,’बुध म्हणजे शहाणा, विद्वान आणि भूषण म्हणजे दागिना’ होय.थोडक्यात ‘विद्वनांचा दागिना’ म्हणजे बुधभूषण ग्रंथ होय.
संभाजीराजे हे फक्त राजेच नाही तर ते महान लेखक, साहित्यिक, संशोधक आणि इतिहासकार ही होते.
या मौल्यवान ग्रंथ म्हणजे पुरंदर,राजगड,व रायगडवरील दुर्गम राजवाडाच होय.या ग्रंथात एकूण ८८३ श्लोक आहेत.त्याचे एकूण तीन अध्यायात विभागणी केली आहे.अध्याय पहिला १९४,अध्याय दुसरा ६३० श्लोक,आणि तिसरा अध्याय ५९ असे एकूण ८८३ श्लोक होय.
हा बहुमूल्य ग्रंथ वाचकांच्या हाती देताना शंभू राजे म्हणतात,
क्षीरावियुक्तं परिह्रूत्य नारीं,क्षीरं भजन्ते खलू राजहंसा:।१७।।
पाण्यात दूध जरी मिसळलेले असले तरी राजहंस,पाण्याचा त्याग करून दुधाचा तेवढा स्वीकार करतात. तसे सह्रदयांनी माझ्या रचनेचे ग्रहण करावे.असे राजे प्रथम विनयाने सांगतात.
पहिल्या अध्यायात प्रथम १७ श्लोकांचा त्यातील १ ते ६ देवदेवतांच्या वंदना आहेत.७ व ८ श्लोकात पितामह शहाजी व पिताश्री जगत् प्रभू छत्रपती शिवाजीराजे यांची अशी अष्टम श्लोकात पुजावंदना आहे. ९ ते १३या पंचश्लोकात या शिवपंचाननाचेच सत्यवास्तव असेच शब्दपुजन आहे.श्लोक १३ वा दुर्गदुर्गेश्वर रायगडावर आहे.१४ व्या श्लोकात त्यांचे आत्मकथन आहे.१५ व १६ व्या बुधभूषण ग्रंथाच्या शब्दप्रदक्षिणेबद्दल आहेत. क्र.१८ ते २८ या श्लोकात अनेक गूढ, अध्यात्मिक व शाक्तपंथाची शिवधर्माची खास रुपे आहेत.२९ ते ६१ हे शिव, कृष्ण, गणनायक, पार्वतीदेवी व हरिस्वरुप आणि शिवपरिवारातील, विभिन्न लोकोभिमुख व लक्ष्मीस्वरूप संपन्नतेचे अवगाहन करतात.
१३६ ते १५४ हे श्लोक पाहिले तर किल्ल्यावर काय काय असावे ही थक्क करणारी माहिती आहे. २१६ ते २४१ आणि २४२ ते २७३ राजाचे विविध अधिकार व सेवक वर्ग, मंत्री आणि यंत्रणाहे श्लोक आपणास निराळ्याच वस्तूनिष्ठ विश्वात नेतात. राजाच्या दूताकडून त्यांची माहिती व त्या मंडळीच्या प्रत्यक्ष आचरणातून चाणाक्ष राजास कळतेच. परंतू राजाची संकटे ही स्वतः राजाचे गुणावगुण ,मंत्री, राष्ट्र,कोश, दुर्ग व बळ यातही असतातच हे आपण या ग्रंथात बारकाईने जाणतो. या संदर्भात राजनितीला ‘दण्डनीती’ हाच शब्द होता. संभाजी राजांच्या ह्या दंडनितीचा व राजनितीचा वापर पुढे देशाची राज्यघटना तयार करतांना घटनाकारांना उपयुक्त ठरला.
संस्कृत भाषेची थोरवी व ज्ञानसंपत्ती जगजाहीर आहे. पण भोसले कुलात शहाजी राजांनी हा खजिना इतर भाषा बरोबर सांभळला.छत्रपती शिवरायांनी दुर्गांची नावे भारतीय संस्कृतीला व येथील भूमीला व मातीला साजेशीच दिली. राज्यव्यवहारकोशासाठी खाशा पंडितास नेमले. आपली मुद्रा ‘प्रतिपदेच्या चंद्रकोरीला’ भिडवली. तर शंभूराजांनी यावर कळस चढवला. बुधभूषणाच्या अंतरंगात बारकाईने गेल्यावर आपणास आपल्या संपतीचे व राजांनी खास घडविलेल्या अलंकाराचे दर्शन होते.
शंभूराजाचे प्रेरणास्थान जसे शिवशंकर-पार्वती होते, तसेच श्रीकृष्ण व बुद्धही होते.त्यांच्या लिखाणावर श्रीकृष्ण आणि गौतम बुद्धाच्या सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. श्रीकृष्णाने स्वकुळातील यादवांना संरक्षण देवून त्यांच्यात स्वातंत्र्याची अस्मिता निर्माण केली.भगवान गौतम बुद्ध स्वतः राजपुत्र असूनही शाक्य विरुद्ध कोलीय ह्या आपसी नातेवाईक असलेल्या गणामधील संघर्ष टाळण्यासाठी सर्वसंग परित्याग करून आयुष्यभर समाजास शिक्षित करीत फिरले.
याशिवाय शंभूराजांच्या आयुष्यातील अनेक घटना ह्या भगवान गौतम बुद्धांच्या आयुष्याशी जुळताना आढळतात.
दोघेही राजपुत्र, दोघेही अत्यंत बुद्धीमान, दोघेही दयावान, दोघांचेही वडील स्वतंत्र राजे, दोघांच्याही आयुष्यात मातेचे मातृछत्र बालपणीच हरवले. दोघांनाही वडिलांनी सर्वश्रेष्ठ शिक्षण दिले. दोघांनाही तरुण वयातच स्वतंत्र राज्यकारभार सांभाळावा लागला. दोघांनाही मंत्र्यांच्या वादिस तोंड द्यावे लागले. दोघांच्याही पत्नीच्या नावात साधर्म्य आले. गौतम बुद्धाच्या पत्नीचे नाव यशोधरा होते तर शंभूराजेंच्या पत्नीचे नाव येशुबाई. दोघींनीही अत्यंत सामर्थ्याने परिस्थितीवर विजय मिळवला. गणसमूहांमध्ये एकता टिकावी यासाठी सिद्धार्थास गृहत्याग करावा लागला, तर स्वराज्य टिकावे यासाठी वयाच्या नवव्यावर्षी शंभूराजांना मोगलांकडे ओलीस रहावे लागले. दोघांनाही आपल्या ज्ञानाचा उपयोग जनसामान्यांना व्हावा यासाठी उद्बोधक लिखाण केले. दोघांनीही भगव्या रंगाचा स्वीकार केला.दोघेही जीवंतपणीच आपापल्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ ठरले.
स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेत भगवान गौतम बुद्धांचे समताधिष्ठीत जीवन आले, तर राजनितीतील छत्रपती संभाजी महाराजांच्या दंडनितीचे अनुकरण समाविष्ट झाले.
योगायोग कसा असतो.आग्रा येथील औरंगजेब बादशहाच्या नजरकैदेतून दि.१५ ऑगस्ट १६६६ रोजी संभाजीराजे बाहेर पडले.आणि १५ ऑगस्टला भारत देश स्वतंत्र झाला.तर २६ जानेवारी १६७१ रोजी राजपुत्र शंभूराजे गणतंत्र पद्धतीने स्वतंत्रपणे कारभार पाहू लागले. आणि २६ जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन ठरला. लोकशाहीची सुरुवात त्याकाळी शंभूराजे यांनी केली.
हीच लोकशाही आम्ही संविधानातून पहातो आहे.
व्यसनानि च सर्वाणि भूपतिःपरिवर्जयेत्।
सप्तदोषा सदा राज्ञा हातच्या व्यसनोदयाः।।४२२।।
श्लोक ४२२मध्ये शंभूराजे राजनितीला सांगून थांबतनाही तर ती आचरणात आणतात. राजाचे सात दोष सांगतात. तेव्हा नक्कीच तथागत गौतम बुध्दांच्या पंचशीलेची आठवण होते.
ते म्हणतात,१) कुणालाही फार टोचून बोलू नये.२) कुणाशीही कठोर बोलू नये ३) संरक्षणाशिवाय राजाने राज्यापासून दुर जावू नये ४) राजाने मादक द्रव्ये,दारु अफू,गांजा असे पदार्थ सेवन करु नयेत.५) राजाने जनानखाना बाळगू नयेपरस्त्री माते समान सन्मान करावा.६)राजाने गरीब,जंगली वा पाळीव प्राण्यांची हत्या करुच नये ७) राजाने द्युत जुगारापासून दूर रहावे.
शंभूराजे धर्मवीर होते.तो धर्म पाळत असत.पण त्यांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवाजीमहाराज महाराष्ट्रधर्म पाळत असत. आणि तोच वारसा शंभूराजेंनी अनुसरला. महाराष्ट्रधर्म हा मानवतावादी होता. समता, बंधूता, स्वातंत्र्य आणि न्याय याचे पालन करणारा होता. छत्रपतीं शिवरायांच्या सैन्यात विविध जाती धर्माचे सैन्य होते. एकता होती. तोच आदर्श छत्रपती संभाजीराजेंनी पुढे चालविला. पुरंदरचा लढा याची इतिहास साक्ष देतो.
धर्माधर्मो विजानन्हि सतां मार्गमनुस्मरन् ।
प्रजा रक्षेन्नृपः साधु हन्याश्च परिपन्थिनः।।१०९।।
धर्म व अधर्माची जाण असलेल्या सर्वांना त्याचप्रमाणे सज्जनांच्या मार्गाचे अनुकरण करणाऱ्या सर्वांचे (प्रजेचे) राजाने चांगले रक्षण करावे,आणि विद्रोही जनांना नष्ट करावे.
राजाची सामान्य कर्तव्य सांगताना शंभूराजे श्लोक (३९७) मध्ये म्हणतात,
ब्राह्मणेषु क्षमी स्त्रिग्धेष्वजिह्मः क्षोभनोरिपु।
स्याद्राजा भृत्यवर्गेषु प्रजासु यथा पिता।।३९७।।
विशेष ब्राह्मणास क्षमाशील, शांत लोकांशी सरळ, क्रोधितांशी शत्रूप्रमाणे, नोकरवर्गाशी व प्रजेशी पित्याप्रमाणे वर्तन करावे.
यावरुन शंभूराजेंचे प्रेम आपुलकी, जिव्हाळा, सहकार्य दिसून येते.
यातील ‘ब्राह्मण’ हा शब्द गौतम बुद्धांच्या ‘ब्राह्मण वग्गो’ यातून घेतला आहे. बुद्ध म्हणतात, शक्तीवान, बुद्धीवान, दयावान आणि शिलवान अशा विविध सद्गुणांनी शुभोभित कोणाही व्यक्तीस ब्राह्मण म्हणावे. शंभूराजांना तथागत गौतम बुद्धाचा हाच ब्राह्मण अपेक्षित केला होता.
तर शंभुराजेच्या विद्वत्तेचे प्रमाण आणि संस्कृतची उंची द्यायचे झाले तर संस्कृतमधील काशीचे प्रसिद्ध पंडीत गागाभट्ट यांनी संभाजीराजे यांच्या गुणवर्णनपर काव्य रचलेला ‘समयनय’ हा ग्रंथ त्यांना अर्पण केला. त्यावेळी झालेल्या आपसातील धार्मिक चर्चेत गागाभट्टभटांनी शंभूराजेंचे श्रेष्ठत्व निर्विवाद मान्य केले. तेव्हा शंभूराजे हे फक्त १८ वर्षाचे होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना शंभूराजेच्या विद्वत्ता ज्ञात होती. म्हणून त्यांनी छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे चरित्र लिहायला घेतले होते,पण तब्येतीच्या अभावी ते पूर्ण करु शकले नाही. याबद्दल त्यांच्या मनाला दुःख झाले.
आजही नवपिढीला ‘बुद्धभूषण’ हा ग्रंथ तितकाच प्रेरणादायी आहे. लोकशाहीला बळ देणारा आहे. संविधानाचे महत्त्व पटवून देणारा आहे. शंभूराजेंचे वाङमयीन साहित्य हे मानसाला ‘माणूस’ बनविणारे आहे. विद्वत्तेचे महत्त्व पटवून देणारे आहे. नवपिढीचे बालशंभू घडविण्यासाठी बुधभूषणाचा आदर्श जनमानसात रुजविणे ही काळाची गरज आहे. समृद्धशाली भारत घडविणारी ही पाय वाट आहे.
चला,
आज शंभूराजे जयंती निमित्त संकल्प करु
‘बुधभूषण’ जनमानसांच्या मनमनात भरु
बाबुराव पाईकराव
डोंगरकडा
९६६५७११५१४