दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : “मी त्यांना म्हटलं की, बाबा रे लोकांनी पाच वर्षांसाठी निवडून दिलं आहे. जरा कळ काढ. पाच वर्ष होऊ दे मग नको उभा राहू. परंतू, आता काय झालं माहिती नाही पुन्हा ते आखाड्यामध्ये आलेले आहेत. पण आपल्याशी किती संपर्क ठेवला ते किती उपलब्ध व्हायचेत हे आपल्याला माहिती आहे. त्यांना अनेकदा त्यांच्या सिरियलच्य शुटींगसाठी मुंबईला जावं लागायचं. त्यामुळे तुम्हाला आता ठरवायचं आहे की, शिरुर लोकसभा मतदारसंघातून तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की, नटसम्राट खासदार हवा आहे,” असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार पवारांनी खासदार अमोल कोल्हेंना लगावला आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघात महायूतीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार चेतन तुपे, माजी आमदार योगेश टिळेकर, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “मागे तुम्ही ज्यांना खासदार म्हणून निवडून दिलं त्यांच्या सभांना मीच येत होतो. परंतू, पाच वर्ष होण्याच्या आधी मध्येच डॉ. कोल्हे मला म्हणायला लागले की, दादा मला राजीनामा द्यायचा आहे. माझं काम खासदार बननं नाही, मी सेलिब्रिटी आहे. मी सिनेमात काम करणारा नट आहे. मी कलांवत आहे. त्यामुळे माझं नुकसान होत आहे.”
शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायूतीने शिवाजीराव आढळराव पाटील तर महाविकास आघाडीने अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे.