राज्यघटनेचे शिल्पकार,विश्ववंदनिय,परमपूज्य बोधीसत्व,युगप्रवर्तक,समस्त देशवासियांचा कैवारी,महामानव,भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर,”यांना, आज जयंतीनिमित् प्रथमतः त्रिवार वंदन तद्वतच मानाचा मुजरा….
आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश त्यांचे स्मरण करत आहे.देशाच्या या महान व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन.
ज्यांच्यामुळे लाखों घरांचा उद्धार झाला…
दीनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला….
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला…
जय भीम ! जय महाराष्ट्र ! जय भारत !
१४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि देशातील महान नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतातील मागासवर्गीय, दलित,गरीब यांच्या उन्नतीसाठी खर्ची केले.ते एक प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ,न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते.त्यांनी केवळ सामाजिक न्याय आणि सामाजिक विषमतेविरुद्धच लढा दिला नाही तर महिला सक्षमीकरणासाठीही बाबासाहेबांनी खूप मौलिक कार्य केले.
बाबासाहेब आंबेडकर हे एक प्रसिद्ध भारतीय कायदेतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ,राजकारणी आणि समाजसुधारक आहेत.त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि प्रजासत्ताक संस्थापकांपैकी एक म्हणून ओळखले जाते.त्याचबरोबर लोकशाही अंतर्गत भारताचे भविष्य घडवण्यात आणि सुनिश्चित करण्यातही त्यांचे योगदान अतुलनीय मानले जावे असेच आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अगदी लहानपणापासूनच जातीय भेदभावामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला.त्याकाळी अस्पृष्य मानल्या जाणाऱ्या समाजातून येत असल्याने आंबेडकरांना प्रत्येक गोष्टीत आपमानास्पद वागणूक सहन करावी लागली.त्यांच्या शाळेत ते एकमेव दलित विद्यार्थी होते,त्यांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसवले जायचे.
पण…… माझे बाबा…..
दलितांची तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले…
होते ते एक गरीबच,पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले…
वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा ते या भारताचे संविधान लिहून गेले…
भेदभाव आणि असमानतेचा सामना करत डॉ. आंबेडकर मुंबई विद्यापीठातून पदवीधर झाले.यानंतर ते एमएसाठी अमेरिकेला गेले. कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेऊन तिथे त्यांनी पीएचडी केली. यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून एमएससी,डीएससी,तर ग्रेज इन येथून बॅरिस्टर-एट-लॉ पदवी घेतली.
ते भारतातील त्या काळातील सर्वात शिक्षित लोकांपैकी एक होते.विशेष म्हणजे आंबेडकर हे परदेशातून डॉक्टरेट पदवी घेणारे पहिले भारतीय होते.
अस्पृश्यता आणि असमानेतीची वागणूक सहन केल्यानंतर,त्यांनी लहान वयातच भारतीय समाजातून या वाईट गोष्टींचे उच्चाटन करण्याचा निर्धार केला होता.शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दलित आणि समाजातील मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी वाहून घेतले.ते संपूर्ण आयुष्य दुबळ्या लोकांच्या हक्कांसाठी लढले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले कायदामंत्री बनवण्यात आले.भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी त्यांच्याकडे सर्वात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली.त्यांना संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष करण्यात आले. राज्यघटना तयार करण्यासाठी त्यांनी अनेक देशांशी सल्लामसलत केली.अनेक देशाच्या राज्यघटनांचा बारकाईने अभ्यास करुन भारताचे संविधान लिहून पूर्ण केले.
त्यांना संविधानाचे जनक आणि राज्यघटनेचे निर्माते म्हटले जाते.ते एक महान अर्थशास्त्रज्ञही होते.आंबेडकरांनी केवळ दलित वर्गासाठीच नव्हे तर महिला आणि कामगारांच्या हक्कांसाठीही लढा दिला.आज आपण बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार आपल्या जीवनात अंमलात आणण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे.
शोषित,पिडीत,उपेक्षित,अछुत, समजल्या जाणाऱ्या दिन दलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या साखळदंड तोडणारा महायोद्धा दिन दलितांचा कैवारी उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाश सूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्यार्जनाचा वापर समाज हितासाठी करणारे पहिले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 891 मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला.त्यांच्या आईचे नाव भिमाबाई व वडिलांचे नाव रामजी आंबेडकर असे होते.त्यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते.ते लहानपणीपासूनच खूप बुद्धिमान व महत्त्वकांशी विचारसरणीचे होते.त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मानहानी सहन करावी लागली पण ते मुळीच खचले नाहीत,डगमगले नाहीत याउलट त्यांनी दलितांच्या उद्धारासाठी’अस्पृश्यता’ हेच जीवनाचे अंतिम ध्येय मानले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून व लंडनमधील विद्यापीठातून घेतले नंतर ते मायदेशी परतले त्यांनी आपल्या बांधवांना “शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा जबरदस्त संदेश दिला. गोरगरीब दिन दलित समाजाच्या न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने सत्याग्रह केले आणी भारतीय जनतेला हक्क मिळवून देवुन समता व बंधुता प्रस्थापित केली.
भारतातील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या दलित आणि मागासवर्गीयांमधील ते पहिले व्यक्ती होते. दलित असल्याने शिक्षणादरम्यान त्यांना अनेक भेदभावांना सामोरे जावे लागले. शाळेत सुरुवातीच्या काळचात त्यांना वर्गाबाहेर बसावे लागले,परंतु त्यांनी शिक्षणाचा ध्यास सोडला नाही. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बॉम्बे विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रात पदवी घेतली.
नोकरी काय,वकिली काय, प्रत्येक ठिकाणी त्यांची अस्पृश्यता आड येत होती. म्हणून त्यांनी मागासलेल्या व दलित जातींचे नेतृत्व करायला सुरुवात केली. शोषित-पीडितांच्या उद्धारासाठी ते कटिबद्ध झाले. देशात जागोजागी संस्था सुरू केल्या.
एका बाजूने डॉ.आंबेडकर सरकारकडून मागासवर्गियांना न्याय मिळवून देत होते तर दुसऱ्या बाजूने अंधविश्वास,वाईट चालीरीती मुळातून उखडून फेकण्याचा प्रयत्न करीत मंदिर प्रवेश,पाणीप्रश्न सोडविण्यात यशस्वी होत होते.अमेरिका प्रवासात डॉ.आंबेडकरांना आजपर्यंत कधीही न मिळालेल समानतेचा व्यवहार अनुभवायला मिळाला.लिंकन व वॉशिंग्टन यांची जीवनचरित्र वाचून त्यांना प्रेरणा मिळाली.त्यांच्या अनुभवाला नवीन रंग मिळाला. अस्पृश्यांच्या अधिकारांसाठी संघर्ष करायला विषेशत्वाने उर्जामय प्रेरणा त्यांना मीडाली.
ते जेव्हा १९१३ मध्ये अमेरिकेत गेले होते. तेव्हा लाला लजपतराय यांनी आंबेडकरांनी भारताच्या स्वातंत्र लढ्यात भाग घ्यावा, यासाठी खूप प्रयत्न केले होते. पण ते त्या वेळी सहमत नव्हते.आता त्यांचे भारताच्या राजकारणावरही नीट लक्ष होते. त्यांनी आपली पूर्ण ताकद भारतातील अस्पृश्योद्धारासाठी वापरली.४ ऑक्टोबर १९३० व १२ सप्टेंबर १९३१ रोजी लंडनमध्ये झालेल्या गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी मुंबईहन ते रवाना झाले होते. त्या परिषदेत भारतातील जातिव्यवस्थेसंबंधी जोरदार शब्दांत आपले विचार त्यांनी मांडले होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक भेदभाव व उच्च नीच भेदभावाचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाची जाहीर रित्या होळी केली.नाशिक काळाराम मंदिरामध्ये दीनदलितना प्रवेश मिळावा म्हणून समानतेसाठी सत्याग्रह केला.महाडच्या चवदार तळ्यावर दीन दलितांना पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला.बहिष्कृत व इतर समाजासाठी ते आशेचे किरण बनले व मूकनायक हे पाक्षिक आणि बहिष्कृत भारत हे साप्ताहिक तर समता हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले.
त्यांनी समाजप्रबोधनाची बहुमूल्य कार्य केले.स्त्री शिक्षणाचा त्यांनी सदैव पुरस्कार केला.असा हा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे महामानव,ज्ञान संवादी तपस्वी अमोघ वक्तृत्व व कुशल नेतृत्व,युग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 6 डिसेंबर 1956 रोजी काळाच्या पडद्याआड गेले.
आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार लाखो लोकांना स्फूर्ती चैतन्य देत आहेत. अशा या महान व्यक्तिमत्वाला माझे विनम्र अभिवादन…..!
दखल न्यूज परीवाराकडुन दखल न्यूज भारतच्या तमाम वाचकांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छां….
लेखक
प्रितम जनबंधू
संपादक – दखल न्यूज भारत तथा “उपाध्यक्ष – विदर्भ प्रदेश,एन.जागतिक मानवाधिकार संघटन भारत…