दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
पुणे : स्वरयोगिनी श्रीमती चारुता आपटे यांना ‘यश प्रतिभा’ हा पुरस्कार रॉयस्मी मिशन (आत्मसिद्ध विश्व परिवार) तर्फे अध्यात्मिक ध्यानगुरु श्री राजेशजी यांचेद्वारा नुकताच प्रदान करण्यात आला. अध्यात्मिक ध्यानगुरु श्री राजेशजी, सोनालीजी , विनोदजी आणि चार्टर्ड अकाउंटंट कनका आपटे हे या गौरव पुरस्कार प्रसंगी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संगीत क्षेत्रातील साधना आणि अध्यात्मिक पद्धतीने त्याची अभिव्यक्ती करण्यासाठी श्रीमती चारुता आपटे ४ दशके कार्यरत आहेत. दूरदर्शन, रेडिओ , विविध कार्यक्रम या माध्यमातून त्यांनी गायन केले आहे. ब्रम्हकुमारीज, गायत्री परिवार, ऋषी संस्कृती विद्या केंद्र अशा संस्थांनी त्यांच्या गायनाच्या ध्वनिमुद्रिका काढल्या आहेत.’ध्यान धारणा’ विषयावरील त्यांची ध्वनिमुद्रिका दक्षिण भारतात विशेष गाजली आहे. उच्च, अलौकिक अवस्थेत जाऊन त्यांनी गायलेली अनेक गीते ही श्रोत्यांच्या अंतःकरणात अद्भुत भावऊर्जा निर्माण करतात. महाराष्ट्रातील गायन क्षेत्र तसेच भारतातील अभिजात संगीत यासाठी त्यांनी केलेली साधना आणि योगदान हे महत्त्वपूर्ण आहे. देश,विदेशातील गायन व संगीत क्षेत्रात अभिरुची असणारे लोक त्यांच्या गायनाचा संगीताचा मंत्रमुग्धपणे अध्यात्मिक आनंद घेत असतात. गायन व संगीत क्षेत्रात मार्गदर्शनही श्रीमती चारुता आपटे करत आल्या आहेत .