
दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी :- येथील बांधकाम क्षेत्रात मजूरी करुन उदारनिर्वाह करणारे बांधकाम मजूर अशोक लांडगे यांचा मुलगा शुभम अशोक लांडगे हा नुकताच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उतीर्ण होऊन मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या सामान्य प्रशासन विभागात सहायक कक्ष अधिकारी म्हणून रुजू झाला आहे.
अतिशय खडतर परिस्थिती कठोर अभ्यास करत शुभमने यशाला घातलेली ही गवसणी आळंदी क्षेत्रात कौताकास पात्र ठरली. त्याच्या या यशाचे अभिनंदन करत आळंदी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी जय भगवान प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोहर दिवाणे, स्वामी समर्थ मंदिराचे व्यवस्थापक सुदाम मोरे, सुरेश कुऱ्हाडे, अशोक लांडगे उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षा करताना कुणी एकटा अभ्यास करतो, असं नसतं. तर अभ्यास करणाऱ्याचं संपूर्ण कुटुंबच ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगत असतं. जोपर्यंत घरातून खंबीर साथ मिळत नाही तोपर्यंत या क्षेत्रात आपण यश मिळवू शकत नाही.
ज्यावेळेस घरातून आर्थिक मानसिक पाठबळ मिळते तेव्हा आपण नक्कीच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवतो, आई-वडिलांचे व मी मनाशी बाळगलेले स्वप्न सत्यात उतरवल्याने खूप आनंद होत आहे. स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये यश मिळवणं खूप कठीण असतं हे सर्व विद्यार्थ्यांना माहीत आहे. पण खचून न जाता भरपूर अभ्यास, योग्य ते मार्गदर्शन घेतल्यास या क्षेत्रामध्ये सुद्धा नक्कीच यश मिळते असे शुभम लांडगे सांगितले.