मूलमध्ये संत रोहिदास जयंती सोहळा संपन्न…

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

            मातंग समाज युवा संघटना मूलच्या वतीने मूल शहरातील ताडाळा मार्गावर समाज बांधवांच्या वस्तीत संत रोहिदास उर्फ रविदास जयंती सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

        संत रविदास यांचा जन्म माघ पौर्णिमेस झाल्याची इतिहासात नोंद आहे आणि यावर्षी माघ पौर्णिमा बुधवार दिनांक १२फेब्रुवारी रोजी आली होती म्हणून यादिवशी हा सोहळा साजरा करण्यात आला.

           मूल शहरातील जेष्ठ पत्रकार व ग्राहक चळवळीतील जागृत ग्राहक राजा या ग्राहक संघटनेचे अध्यक्ष दीपक देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून रमेश मांदाळे,रा.स्व.संघाचे प्रचारक,तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डाॅ. किरण कापगते आणि मातंग संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रमुख समय्या पोचमपसुल्ला,यांचेसह माजी नगरसेविका सुनिता बोलिवार, शंकर नक्कावार , शामराव लाटेलवार, तुळशीराम बोलिवार मंचावर उपस्थित होते.

        संत रविदास यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, त्यानंतर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

         संघटनेचे जिल्हाध्यक्ष भिमराव इटकेलवार यांनी प्रास्ताविक केले, त्यानंतर समय्या पोचमपसुल्ला यांनी संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याची माहिती देताना राज्य शासनाच्या सकारात्मक प्रतिसादाची चर्चा करताना लवकरच आपल्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर बोलणी सुरू असून देवेंद्र फडणवीस सरकार सहकार्य करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

         याचवेळी आपल्या समाजाला जिथे आपल्या समाजाची २०-३०घरे असतील तिथे समाजमंदिर बांधकाम करुन मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत मात्र आपला समाज पूर्ण ताकदीने त्यासाठी संघटनेच्या पाठिशी उभा राहत नसल्याची खंतही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली आणि आपल्या मागण्यांसाठी एकत्र लढा देण्याची आवश्यकता प्रतिपादन केली.

          याप्रसंगी रमेशजी मांदाळे,किरण कापगते यांनी समाजप्रबोधनाची व कोणत्याही भुलथापांना बळी न पडता आपल्या समाजाला उन्नती व प्रगतीचा मार्ग दाखविण्यासाठी समाजजागृती ची आवश्यकता प्रतिपादीत करतांना संत महंतांच्या शिकवणुकीचा आदर्श उराशी बाळगून त्याचा आपल्या आचरणात वापर करण्याची आवश्यकता पटवून दिली व काही इतर धर्मीय लोक पैसे व नौकरीचे आमिष दाखवून धर्म परिवर्तन घडवून आणत असल्याचे स्पष्ट करताना आपण आपल्या विचारांशी प्रामाणिक राहण्याची आवश्यकता प्रतिपादन केली.

         आपल्या अध्यक्षीय भाषणातून दीपक देशपांडे यांनी केवळ फुकटच्या गोष्टींच्या मागे न लागता आपल्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून आपण करीत असलेल्या कामांची लाज न बाळगताआपल्या मनगटावर विश्वास ठेवून कार्यप्रवण राहून यश संपादन करण्यासाठी आपल्या समाजातील संतमहंतांची शिकवण डोळ्यासमोर ठेवून कार्य करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले ,तरच अशा कार्यक्रमांचे आयोजनाचा उद्देश सफल होईल अन्यथा हे कार्यक्रम म्हणजे केवळ औपचारिकता ठरेल असे स्पष्ट केले.

         बंडू गोलकोंडावार सावली यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले,या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मातंग समाज बांधव व भगीनींनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला, कार्यक्रमानंतर समस्त समाजबांधवांनी भोजनाचा आस्वाद घेतला,व ढोलताशांच्या गजरात उत्सव नाच गायनाने साजरा केला.