भद्रावतीच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिन साजरा…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

भद्रावती,दि.१४ :- येथील शहीद नानक भील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिन नुकताच साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील पाॅवर ग्रीडचे महाव्यवस्थापक प्रितम बोरकर होते.तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्य व्यवस्थापक दिनेश पाल, लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य रुपचंद धारणे, आय.एम.सी.सदस्य दिलीप राम, शिल्प निदेशक एस.व्ही. सोनुलकर, एस.एम. चिलवरवार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

           सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

            यावेळी प्रमुख अतिथी रुपचंद धारणे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला आणि उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रितम बोरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्रशिक्षणार्थी युवकांनी आपल्यातील कौशल्य विकसित करुन भविष्यात मोठे होण्याचे आवाहन केले. यावेळी प्रमुख अतिथी दिनेश पाल यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

          याप्रसंगी विविध स्पर्धांमध्ये विजय प्राप्त केलेल्या प्रशिक्षणार्थी युवकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

            या स्पर्धांमध्ये १०० मी.धावणे, क्रिकेट, निबंध आणि चित्रकला या स्पर्धांचा समावेश होता. तसेच या प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेऊन यशस्वी उद्योजक झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपली यशोगाथा सांगत संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

           कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन शिल्प निदेशक यामिनी बोपले यांनी केले. तर आभार शिल्प निदेशक एस.व्ही.सोनुलकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस.जे.वऱ्हाडे, एस.एम.चिलवलवार, एस.पी.वावरे, एच.पी.रामटेके आणि इतर सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले.