
सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चे संकेतस्थळ (पोर्टल) चालू नसल्याने या योजनेसाठी अद्यापही अर्ज भरलेले नाहीत अथवा काही महिलांचे वय २१ वर्षे पूर्ण झाले आहे, अशा महिला या योजनेचे अर्ज भरण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी हे संकेतस्थळ केव्हा खुले होणार? याकडे बहिणींचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी महायुती सरकाने मध्यप्रदेश विधानसभा निडणुकीचा पॅटर्न राबवत महाराष्ट्रातही ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू केली.
यासाठी कुटुंबातील दोन महिला, उत्पन्न अडीच लाखांच्या आत, चारचाकी वाहन, नोकरदार व करदाता नसणे अशा अटी ठेवण्यात आल्या होत्या. महायुती सरकारने या योजनेचा मोठा धुरळा उडविला आणि मोठ्या मताधिक्याने बहुमत मिळवत सत्ता मिळविली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपोटी जून ते ऑक्टोबर असे एकदम ५ महिन्यांचे ७५०० रुपये महिलांच्या बँक खात्यात पाठविले. त्यामुळे सर्वांच्या बरोबरीने गोरगरीब जनतेची दिवाळी गोड झाली. आता परत लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या शेवटच्या महिन्यात १५०० रुपयांचा हप्ता जमा करण्यात आला आहे.
त्यामुळे या योजनेपासून वंचित राहिलेल्या व पुढे २१ वर्षे वयाची पूर्तता होणाऱ्या पात्र महिलांना या योजनेचा अर्ज भरण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.
महायुतीचे सरकार पोर्टल कधी खुले करणार? असा प्रश्न त्यांना पडला आहे.
कोट
अनेक लाडक्या बहिणी माझ्या केंद्र स्थळी अर्ज दाखल करण्यासाठी येत आहेत.मात्र लाडक्या बहिणींना आल्या पावलीच परत जावे लागत आहे त्यामुळे लवकरात लवकर संकेत स्थळ सुरू करण्यात यावे.
आपले सरकार सेवा केंद्र,संचालक
रूपचंद लाटेलवार
लिंक बाबत साशंकता……
21 वर्ष पुर्ण वयाची अट असल्याने त्यावेळी आपल्या लाडक्या बहिणींचे वय बसत नव्हते,त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज दाखल केले नाही.आता 1 महिन्यांपूर्वी आमचे वय 21 वर्ष पूर्ण झाले आहे,पण या योजनेची लिंक अथवा पोर्टल सुरू नसल्याने अर्ज कुठे व कुणाकडे भरून द्यायचा ,असा प्रश्न आहे.तरी आपल्या लाडक्या बहिणींना सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने संकेतस्थळ खुले करून माहिती द्यावी.