
रामदास ठुसे
नागपूर विशेष विभागीय प्रतिनिधी
नगर परिषदे अंतर्गत शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग, मुख्य बाजारपेठेच्या मार्गावर अनेक लहान मोठ्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. आता अतिक्रमण काढण्यासाठी नगर परिषद अॅक्शन मोडवर आहे. येत्या १५ जानेवारीपर्यंत अतिक्रमण न काढण्यास कारवाई करण्यात येणार आहे. त्याअनुशंगाने अनेकांना नोटीस बजाविण्यात आले आहे.
चिमूर वरोरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ वरील फुटपाथ, डोंगरवार चौक यावले चौक नेहरु चौक या मार्गावर लहान मोठ्या दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणावर नगर परिषदेने कित्येकदा कारवाई केली. त्यानंतरही हातठेले, भाजीपाला, फळे विक्रेता, हॉटेल, इतर साहित्य विक्री करणाऱ्यांनी शेड उभारले आहेत. काही मोठ्या दुकानदारांनी आपल्या दुकानापुढे रस्त्यावर दुकानाचे साहित्य ठेवले आहेत.
यामुळे बाजारात येणाऱ्या वाहनचालकांना वाहन ठेवण्यासाठी जागा शोधावी लागते. कित्येकदा वाहने रस्त्यावरच उभी करावी लागतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अतिक्रमणामुळे नागरिकांनाही मार्गक्रमण करणे जिकरीचे झाले आहे. आठवडी बाजार शुक्रवारला राष्ट्रीय महामार्गावर भरतो. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. नगर परिषदेत नव्याने रुजू झालेल्या मुख्याधिकाऱ्यांनी अतिक्रमणाचा विषय गांभीयनि घेतला आहे.
अतिक्रमण काढण्याबाबत व्यापारी, दुकानदारांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. उपविभागीय अधिकारी, पोलिस प्रशासनाशी चर्चा करून अतिक्रमण काढण्याची संयुक्त कारवाई करण्यात येईल.