फुले दाम्पत्याच्या कार्यकर्तृत्वाचा प्रचार व प्रसार व्हावा :- विजय वडवेराव… — पहिला आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल उत्साहात साजरा…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक

पुणे : भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव यांच्या संकल्पनेतून देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आला. महाराष्ट्रासह देशविदेशातून ६०० कवी, साहित्यिक, विचारवंत, कलाकार यामध्ये सहभागी झाले. चार दिवसांच्या या फेस्टिवलमध्ये जवळपास १५०० रसिकांनी उपस्थिती लावली. सहभागी ६०० कवींना भारतीय संविधानाची प्रत, सन्मानचिन्ह, फुलेप्रेमी लेखणी व मानपत्र देऊन गौरवण्यात आले. संविधानाबाबत जागृती, प्रचार करण्याच्या उद्देशाने संविधान जागर अभियान राबविण्यात आले.

          विजय वडवेराव म्हणाले, “देशातील पहिल्या मुलींच्या शाळेचा इतिहास जतन व्हावा, फुले दाम्पत्याच्या कार्यकर्तृत्वाचा प्रचार व प्रसार व्हावा आणि हा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या फेस्टिवलचे आयोजन केले होते. देश-विदेशातील सहाशे कवींचा काव्य महोत्सव, भिडेवाड्यावर मराठी गझल मुशायरा, एकपात्री प्रयोग, शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा, एकांकिका, सांगितिक पोवाडे, महिला सक्षमीकरणासाठी लाठीकाठी, दांडपट्टा प्रात्यक्षिक असे विविध कार्यक्रम फेस्टिव्हलमध्ये झाले. ऑस्ट्रेलिया, अबुधाबी, दुबई या देशांतून, तसेच केरळ, मध्यप्रदेश, राजस्थान, गोवा, कर्नाटक, गुजरात, दिल्ली, तेलंगणा, उत्तरप्रदेश आदी राज्यातून कवी-कवयित्री सहभागी झाले. यापुढे पुण्यात दरवर्षी भव्य आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे.  

           भिडेवाडा अभियानात विशेष कार्य करणाऱ्या जगभरातील २५ फुलेप्रेमी कवी, कवयित्री व कार्यकर्त्यांना फेस्टिव्हलमध्ये ‘आंतरराष्ट्रीय फुलेप्रेमी समाजरत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये अनेक फुले प्रेमींना सन्मानित करण्यात आले.