दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर झाले असून, संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्याबद्दल सन २०२४ चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संजय महाराज पाचपोर यांना जाहीर झाला आहे.
मंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांची समिती या पुरस्कारांची शिफारस करण्यात आली होती. विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार असून सर्व पुरस्कारार्थींचे मंत्री मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे. संगीत व गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदानाबद्दल ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झालेला आहे.
शास्त्रीय संगीतासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पण केले आणि शास्त्रीय संगीत क्षेत्राची सेवा केली, त्या कलाकारांच्या योगदानाबद्दल दिला जाणारा २०२४ च्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार आरती अंकलीकर-टिकेकर यांना जाहीर झाला आहे.
नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार – २०२४ साठी मराठी रंगभूमीवर कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या प्रकाश बुध्दीसागर यांना जाहीर झाला आहे. संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव २०२४ चा पुरस्कार श्रीमती शुभदा दादरकर यांना जाहीर झाला आहे. संगीत रंगभूमीसाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल त्यांना गौरविण्यात आले आहे.
तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार २०२३ साठी शशिकला झुंबर सुक्रे यांच्या नावाची घोषणा झाली असून, २०२४ साठीचा पुरस्कार जनार्दन वायदंडे यांना जाहीर झाला आहे. तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ मान्यवर कलाकारास या पुरस्काराने गौरविण्यात येते.
राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२४ ची घोषणा
राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये एकूण बारा वर्गवारी असून, यामधील प्रत्येक वर्गवारीमध्ये प्रत्येकी एक पुरस्कार जाहीर झाला आहे. नाटक या विभागासाठी २०२४ चा पुरस्कार श्रीमती विशाखा सुभेदार, उपशास्त्रीय संगीत वर्गवारीमध्ये २०२४ चा पुरस्कार डॉ. विकास कशाळकर, कंठसंगीत प्रकारातील २०२४ चा पुरस्कार सुदेश भोसले यांना घोषित झाला आहे.
लोककला क्षेत्रातील २०२४ चा पुरस्कार अभिमन्यू धर्माजी सावदेकर यांना जाहीर झाला असून शाहीरी क्षेत्रातील २०२४ चा पुरस्कार शाहिर राजेंद्र कांबळे यांना घोषित झाला आहे. नृत्य वर्गवारीतील २०२४ साठी श्रीमती सोनिया परचुरे यांची निवड झाली आहे.
चित्रपट क्षेत्रासाठी २०२४ चा पुरस्कार श्रीमती रोहिणी हट्टंगडी यांना घोषित झाला आहे. तसेच कीर्तन प्रबोधन क्षेत्रातील २०२४ चा पुरस्कार संजयनाना धोंडगे, वाद्यसंगीत क्षेत्रातील २०२४ साठी पांडुरंग मुखडे, कलादान या प्रकारात २०२४ साठी नागेश सुर्वे (ऋषीराज) यांच्या नावाची घोषणा झाली आहे.
तमाशा वर्गवारीतील २०२४ चा राज्य सांस्कृतिक पुरस्कार कैलास मारुती सावंत यांना घोषित झाला आहे. तर आदिवासी गिरीजन वर्गवारी मध्ये २०२४ साठी शिवराम शंकर धुटे यांची निवड करण्यात आली आहे.