मिलिंद विद्यालय गौरखेडा चांदई येथे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप… 

युवराज डोंगरे/खल्लार 

           उपसंपादक

         नजिकच्या गौरखेडा (चांदई)येथिल मिलिंद विद्यालयात वर्ग पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. 

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुल व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावतीचे अध्यक्ष क्षितिज मधुकरराव अभ्यंकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गौरखेडा सरपंच सौ. मीनाताई शेंदुरकर ,माटरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक अन्सार खाॅ पठाण व मिलिंद विद्यालयाचे मुख्याध्यापक अमितकुमार वानखडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

           याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.अध्यक्षीय भाषणातून क्षितिज अभ्यंकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केला पाहिजे. अभ्यासातूनच आपलं व्यक्तिमत्व उजागर होत असते. संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्यापैकीच दरवर्षी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो.

            विद्यार्थ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा न्युनगंड निर्माण होऊ नये,गरीब श्रीमंत व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपण विद्यार्थी आहोत ही भावना रुजवण्यासाठी शाळेचा गणवेश हा फार महत्त्वाचा आहे.

         म्हणून विद्यार्थ्यांनी दररोज गणवेश यामध्ये यावं आणि गणवेशाच्या माध्यमातून आपल्या विद्यालयाचा लोकांमध्ये परिचय करून द्यावा. असे विचार मांडले.

            याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक अमित कुमार वानखडे व सूत्रसंचालन विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक अमोल बोबडे तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक प्रशांत वानखडे यांनी पार पाडले या कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.