कर्मवीर महाविद्यालय मूल येथे ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रम… — विद्यार्थ्यांनी द्विधा मनःस्थितीतून बाहेर पडण्याची आवश्यकता :- प्रा.डाॅ.भावना टेकाम. — विद्यार्थ्यांनी जागरुकता जोपासणे गरजेचे :- प्रा.डाॅ.अनिता वाळके. — विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच ग्राहक म्हणून आपल्या अधिकारांची जाणीव जोपासावी :-दीपक देशपांडे.. — दीपक देशपांडे यांचा सत्कार…

     रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी..

    आज जागतिक महिला आणि जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आज सगळ्यात महत्वाची गरज आहे ते काय चांगले आणि काय वाईट यांची निवड करण्याची कारण १८ते२५ या वयात तुम्ही पौगंडावस्थेत असतांनाच आपले आयुष्य आकार घेत असते आणि यशापयशावर पुढिल आयुष्य अवलंबून असते.

        त्यामुळे आधी आपल्या तब्येतीची काळजी घेत अपयशाने खचून न जाता अपयशालाच यशाची पायरी करुन मार्गक्रमण करण्याची आवश्यकता आहे आणि हे करताना आपली सारासार विचार करण्याची मानसिकता तयार करून लक्ष केंद्रित केले तर यश निश्चितच मिळणार आहे आणि आपले भविष्य घडवता येणार आहे.

            यावेळी ग्राहक म्हणून आपल्या अधिकारांची माहिती करून घेत मार्गक्रमण केले तर यश नक्कीच मिळणार आहे.असे उद्गार प्रमुख अतिथी म्हणून बोलताना प्रा.डाॅ.भावना टेकाम देवनील नर्सिंग स्कूल यांनी काढले.

        गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालय मूल येथे जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेच्या वतीने जागतिक ग्राहक हक्क दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

        या कार्यक्रमात प्राचार्या डॉ.अनिता वाळके या अध्यक्षस्थानी होत्या तर विशेष अतिथी म्हणून डॉ.भावना टेकाम आणि जागृत ग्राहक राजा या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दीपक देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

       यावेळी व्यासपीठावर, अशोक मैदमवार उपाध्यक्ष, रमेश डांगरे सचिव, डॉ.आनंदराव कुळे आणि दिलीप कटलावार, हे कार्यकारिणी सदस्य तसेच महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक दिनेश बनकर उपस्थित होते.

         आपल्या शैलीत विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीचा वेध घेत ग्राहक संरक्षण कायदा,आपले अधिकार आणि फसवणूक प्रकाराबाबत मार्गदर्शन करताना ग्राहक संरक्षण कायदा मंजूर होऊनही ३८-३९ वर्ष झाली असली तरी अजूनही ग्राहकांना या कायद्याची आणि त्यातील तरतुदींची माहिती नाही असली तरी परीपूर्ण ज्ञान नाही. त्यामुळे फसवणुकीच्या प्रकारांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे आणि आम्ही असे मानतो की आजचा विद्यार्थी हा आजचाच नागरिक आहे.

        त्यामुळे त्यांना या कायद्याची माहिती व्हावी आणि तो कुठल्याही प्रलोभनांना भुलथापांना बळी न पडता स्वतंत्र निर्णय घेऊ शकला पाहिजे त्यामुळे तो स्वतः चे आणि कुटुंबाचे फसवणूकीपासून रक्षण करण्यासाठी सक्षम बनला पाहिजे.

         शासकीय यंत्रणेद्वारे या ग्राहक संरक्षण कायद्याच्या जनजागृती साठी मोठा गाजावाजा केला जातो.मात्र शासकीय यंत्रणा त्याची पाहिजे तशी प्रचारयंत्रणा राबवत नाही परिणामी शोषण व फसवणूक दिवसेंदिवस वाढतच आहे.

          याच कारणाने आम्हाला जागृत ग्राहक राजा या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा जागृतीचा कार्यक्रम राबवावा लागत असल्याचे जागृत ग्राहक राजा या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दीपक देशपांडे यांनी आपल्या प्रबोधनातून स्पष्ट केले.

        याप्रसंगी उठता आपण बसतील विघ्ने चे स्पष्टीकरण करताना आपण आपल्या अधिकारांप्रती सजग झालो आणि फसवणूकीविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली तरीही अर्ध्याहून अधिक समस्या निकाली काढण्यात यशस्वी होऊ शकतो हे सोदाहरण स्पष्ट केले.

        तर आमच्या कार्यकर्त्यांनी अभ्यासोनी प्रकटावे ना तरी प्रकटोची नये ह्या भुमिकेतून अभ्यास करून समस्या मांडण्याचा प्रयत्न केला तर समस्येवर तोडगा काढणे सहजसुलभ होते आणि आम्ही जागृत ग्राहक राजा या संघटनेच्या माध्यमातून कोणतीही समस्या मांडत असताना त्याची सोडवणूक करण्यासाठी पर्यायी व्यवस्था काय असावी ह्याचाही आराखडा संबंधित अधिकाऱ्यांसमोर ठेवत असल्याने तोडगा काढणे सोपे होते. असाच पर्याय तुम्ही अवलंबला तर उद्याचे सक्षम नागरिक बनण्यापासून तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही हेही स्पष्ट केले.  

         सत्काराला उत्तर देताना हा सत्कार म्हणजे वाढलेल्या जबाबदारीचे भान ठेवण्याची आठवण करून देणे असा अर्थ मी काढतो आणि तेवढ्याच ताकदीने नव्या उत्साहाने कार्य करतो, म्हणून मी कधीच मागे वळून पाहिले नाही. बघण्याची आवश्यकता वाटली नाही आज तर माझ्यासोबत विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी खंबीर पणे उभी आहे, त्यामुळे नवीन जोखीम स्वीकारण्याची तयारी करुन ती यशस्वी करण्यासाठी आम्ही सामुहिक प्रयत्न करीत आहोत. हेही स्पष्ट केले.

          ग्राहक म्हणून आपण आपल्या अधिकारांची माहिती मिळवून घेत सजगपणे व्यवहार केला तर आपली फसवणूक सहज टाळू शकतो असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात डॉ.अनिता वाळके यांनी केले.

         आज अर्थव्यवस्थेचा पाया ग्राहक असून त्याने आपल्या अधिकारांची जाणीव करून घेत व्यवहार केले तर फसवणूक टाळता येऊ शकते,असेही पुढे स्पष्ट केले.अशाप्रकारच्या जागृती अभियानामुळे ग्राहकांचे प्रबोधन व अधिकारांची जाण होण्यासाठी मदतच होणार असून प्रत्येकाने ती करुन घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

        महाविद्यालयाच्या वतीने ग्राहक जागृतीचे कार्य अविरतपणे करीत असल्याबाबत जागृत ग्राहक राजा या संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे स्वागत व अभिनंदन करीत यशस्वी होण्याची कामना केली. शुभेच्छा दिल्या.

        दीपक देशपांडे यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांना शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

        या कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले.

        दिक्षा चरडुके, भाग्यश्री जक्कुलवार, दामिनी लेनगुरेआणि रुतु मोहुर्ले या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी अवघ्या काही मिनिटांत चाल लावून सुंदरतेने ग्राहक गीत गायन केले ,अतिथींचे स्वागत महाविद्यालयाची स्मरणिका देऊन करण्यात आले. प्रास्ताविक संघटनेचे उपाध्यक्ष अशोक मैदमवार यांनी केले तर पहिले पुष्प गुंफले डॉ.आनंदराव कुळे यांनी रमेश डांगरे सचिव यांनी आँनलाईन खरेदी व्यवहार व फसवणुकीच्या प्रकाराबाबत माहिती दिली व सावधानता बाळगावी असे आवाहन केले.

       डॉ.आनंदराव कुळे यांनी फसवणुकीच्या वेगवेगळ्या प्रकारांचा उहापोह केला.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा.निरज चन्ने यांनी केले.

        या कार्यक्रमात कनिष्ठ महाविद्यालय व कर्मवीर महाविद्यालयाच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सभागृह भरुन गेले होते.या कार्यक्रमाला प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते, राष्ट्रगीत गायन करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.