धामणगाव वाठोडा येथे पंधरा दिवसीय सामाजिक स्वास्थ्य सेवा शिबिराचे उद्घाटन… — विविध आरोग्य तपासणीसह आरोग्यविषयक जनजागृतीचे उपक्रम राबविणार…

      रोहन आदेवार 

साहाय्यक जिल्हा प्रतिनिधी…

   वर्धा:- महात्मा गांधी आरोग्य संस्थान,सेवाग्राम कस्तुरबा दवाखान्याच्या वतीने धामणगाव वाठोडा येथे पंधरा दिवसीय सामाजिक स्वास्थ्य सेवा शिबिराचे उद्घाटन दिनांक 8 रोजी संध्याकाळी 4 वाजता मोठ्या उत्साहात पार पडले.

             उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद वर्धाचे मुख्य कार्यपालन अधिकारी जितिन रहमान,कस्तुरबा आरोग्य मंडळाचे सचिव डॉ.बी.एस.गर्ग,डीन डॉ.ए.के.शुक्ला,वैद्यकीय अधीक्षक डॉ.पूनम वर्मा,धामणगाव वाठोडा येथील सरपंच रेश्माताई प्रफुलराव कुचेवार,जिल्हा परिषद सदस्य सौ.सुनीताताई चांदुरकर,सामुदायिक वैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. सुबोध गुप्ता आणि शिबिर इंचार्ज डॉ.अनुज मुंदडा उपस्थित होते.

     कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक भगवान मेश्राम यांच्या बँड पथकाने पाहुण्यांचे विशेष स्वागत केले.

       या शिबिरात 2024 बॅचचे एमबीबीएस विद्यार्थी गावातील नागरिकांच्या आरोग्य समस्या जाणून घेणार असून आरोग्यविषयक विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

          शिबिरातील महत्त्वाचे उपक्रमातंर्गत आरोग्य तपासणी,ग्राम स्वच्छता अभियान,सहजीवन मेळावा,आरोग्यमय स्पर्धा,जनजागृती रॅली,किशोरी मेळावा,महिला मेळावा,सुदृढ बालक स्पर्धा,योग शिबिर गावातील आशा सेविका,अंगणवाडी सेविका आणि किरण क्लिनिक यांची कामे विद्यार्थ्यांसमोर सादर केली जाणार आहेत.

          याशिवाय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंच,शाळा व्यवस्थापन समिती,पोलिस पाटील आणि किरण क्लिनिक समिती यांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

       कार्यक्रमाचे संचालन डॉ. अभिषेक राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.अनुज मुंदडा यांनी मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.