दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
पुणे : विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेल्या व्यक्ती समाजात विधायक बदल घडवितात आणि अशा व्यक्ती एकत्र येऊन बनलेला समूह इतिहास घडवितो. असाच एका ध्येयाने प्रेरित झालेला ग्रुप म्हणजे पुणे (महाराष्ट्र) येथील ‘मराठा वारिअर्स.’ अनेक साहसी मोहिमा यशस्वी केल्यानंतर यावर्षी पुन्हा एकदा हे वारिअर्स सज्ज झाले आहेत पुणे ते नेपाळ सायकल प्रवासासाठी!
या मोहिमेचा शुभारंभ रविवार, दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ७ वाजता भोसरी (पुणे) येथून पीएमटी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. या सायकल मोहिमेत संदीप जगताप, बजरंग मोळक, विश्वास काशीद, प्रशांत जाधव, संतोष दरेकर, नारायण मालपोटे, निलेश धावडे हे वारिअर्स सहभागी झाले असून या मोहिमेचे नेतृत्व संदीप जगताप करत आहेत या शुभारंभ प्रसंगी माजी उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, हभप पुरुषोत्तम महाराज पाटील, आळंदी पोलिस स्टेशनचे मच्छिंद्र शेंडे, अविरत फौंडेशनचे अध्यक्ष निसार सय्यद, अमित आंद्रे, नितीन घोलप, महेश पगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात म्हणजे २०२३ या वर्षातील मराठा वारिअर्सची ही पहिली मोहीम आहे. विशेष म्हणजे पुणे ते नेपाळ या मोहिमेचे अंतर देखील २०२३ किलोमीटर आहे. दोन देशांना जोडणार्या या प्रवासात सर्व सहभागी वारिअर्स मैत्रीचा, सामाजिक एकतेचा संदेश देत भारताने ७५ वर्षात केलेल्या प्रगतीचा आलेख सर्वदूर पोहोचविणार आहेत. पुणे येथून सुरुवात झालेली ही मोहीम पुढे इंदोर (मध्यप्रदेश), अयोध्या (उत्तर प्रदेश) अशी तीन राज्यांतून प्रवास करत नेपाळमधील काठमांडू शहरात येेथे पोहोचणार आहे.
मराठा वारिअर्सने यापूर्वी २०१७ मध्ये लेह-लढाख बुलेट राईड, २०१९ मध्ये पुणे ते वाघा बॉर्डर सायकल प्रवास, २०२१ मध्ये पुणे ते पानिपत सायकल प्रवास आणि २०२२ मध्ये पुणे ते हम्पी बुलेट राईड अशा साहसी मोहिमा यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत.
पुणे येथून सुरू झालेली ही मोहीम आज सकाळी हुतात्मा राजगुरु, भगतसिंग, सुखदेव स्मृती स्थळ, राजगुरुनगर याठिकाणी पोहोचली. याठिकाणी ‘मराठा वारिअर्स’चे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी हुतात्मा राजगुरु, भगतसिंग, सुखदेव यांना अभिवादन करून सर्व सायकलस्वार यांचे सत्कार करण्यात आले. तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी महाराष्ट्र क्राईम बॉर्डर चे नितीन सैद, दावडी गांव चे मा. सरपंच संतोष गव्हाणे, आमदार सुनील अण्णा शेळके यांचे स्वीय्य सहाय्यक मंगेश कुलकर्णी, सागर जोशी, जैदवाडी गांव चे सदस्य विजय जैद, हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशन चे सचिव अमर टाटीया, माऊली सेवा प्रतिष्ठाण चे कैलास दुधाळे, दावडी गांव चे मा. सदस्य हारून शेख, किरण कहाणे, सुमित चासकर व राजगुरनगर वासीय उपस्थित होते.