लाडबोरी ग्रा.पं.कडून जंगम मालमत्तेची झाली परस्पर विक्री.. — सरपंच,उपसरपंच यांनी रक्कम हडप केल्याचा पत्रकार परिषदेतून केला आरोप.. — सरपंच,उपसरपंच यांना अपात्र करण्याची मागणी..

    अमान कुरैशी

जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर 

        सिंदेवाही :- पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत असलेल्या लाडबोरी ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक जंगम मालमत्ता ( बाभूळची झाडें) यांची सरपंच ममता चहांदे,उपसरपंच मंगेश दडमल व तत्कालीन सचिव यांनी शासनाची व गावातील नागरिकाची फसवणूक करीत रतिलाल शेंडे या ठेकेदाराशी संधान साधून झाडांची परस्पर विक्री करून आलेली रक्कम सरपंच,उपसरपंच यांनी हडप केली असल्याचा आरोप ग्राम पंचायत सदस्य कमलाकर बोमनपल्लीवार यांचेसह इतर सदस्यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. 

                    सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी ही ९ सदस्य असलेली ग्राम पंचायत असून या ग्राम पंचायत हद्दीमध्ये बाभळीची व काही इतर किसमची झाडे आहेत.ग्राम पंचायत सरपंच ममता चहांदे,उपसरपंच मंगेश दडमल, व तत्कालीन ग्रामसेवक यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता इतर कोणत्याही सदस्याला विश्वासात न घेता व न विचारात स्वतःच्या मनाने झाडे विकली.यासंबंधाने पंचायत समितीला कोणताही पत्र व्यवहार न करता आणि कोणताही लिलावाचा नोटीस न काढता दिनांक २८/११/२०२२ ला झाडे विक्रीचा बोगस लिलाव करून ८०,हजार रुपयाला झाडे कापण्याचा ठेका आपल्याच मर्जीतील रतिलाल शेंडे या व्यक्तीला दिला.

           त्याने अनामत रक्कम म्हणून ग्रामपंचायत कडे फक्त पाच हजार रुपये जमा केले.मात्र या पाच हजार रुपयांवर झाडाची कटाई करून सदर झाडें कापून रतीलाल शेंडे नामक व्यक्ती घेऊन गेला. 

          मात्र उर्वरित रक्कम ही ग्रामपंचायतच्या कोणत्त्याही खात्यात जमा केली नाही.ग्राम पंचायत सदस्य म्हणून मी अनेकदा मासिक सभेमध्ये झाडांच्या पैशाबाबत विचारणा करीत होतो. 

         मात्र,सरपंच तथा तत्कालीन ग्रामसेवक यांनी उडवाउडवची उत्तरे देऊन वेळ मारून नेला. त्यामुळे आम्ही दिनांक २७ /२ / २०२३ ला सार्वजनिक मालमत्तेची रक्कम हडप केल्या प्रकरणी पंचायत समिती सिंदेवाहीचे गट विकास अधिकारी अक्षय सुक्रे यांना लेखी तक्रार देऊन कळविले. 

            नेहमी प्रमाणे गट विकास अधिकाऱ्यांनी सरपंच,उपसरपंच व सचिव यांच्याशी असलेल्या आर्थिक हित संबंधाने त्यांचेवर कोणतीही कारवाही केली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य कमलाकर बोमनपल्लिवार,सुरेश नन्नावरे,बेबीनंदा नागदेवते,सरिता लोखंडे,यांनी दिनांक ६/१०/२०२३ रोजी पोलीस स्टेशन सिंदेवाही इथे फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार सादर केली. 

          सरपंच ममता चहांदे,उपसरपंच मंगेश दडमल,यांनी ग्राम पंचायतची सार्वजनिक मालमत्ता परस्पर विकून आलेली रक्कम स्वतः हडप करण्याचा प्रयत्न केला.

         मात्र,पोलीस तक्रार होताच काही रक्कम ग्राम पंचायत मध्ये जमा केली असली.तरी लिलावाचा कोणताही नोटीस न काढता,कोणत्याही सदस्यांना विश्वासात न घेता,फक्त दोन लोकांच्या उपस्थितीत बोगस लिलाव करून लाखो रुपयाची मालमत्ता केवळ ८० हजार रुपयात विक्री केल्याने,ग्राम पंचायतचे आर्थिक नुकसान झाले असल्याने सरपंच व उपसरपंच यांचेवर फौजदारी कारवाई करून दोघानाही अपात्र करण्यात यावे,अशी मागणी ग्राम पंचायत सदस्य कमलाकर बोमनपल्लीवार,सुरेश नन्नावरे, बेबीनंदा नागदेवते,सरिता लोखंडे, यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे..