
दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : पुणे – आळंदी रोड, देहूफाटा ते जगताप मंगल कार्यालय (काटे वस्ती) हा रस्ता गेली पाच वर्षांपासून प्रचंड प्रमाणातील वाहतूक कोंडीचा, व मृत्यूचा सापळा बनला आहे, या ठिकाणी आजपर्यंत डंपर खाली सापडून पाच व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, परवा एका महिलेचा याच ठिकाणी डंपर खाली सापडून मृत्यू झाल्याने येथे असणाऱ्या झोपडपट्टीतील सुमारे 40 वर्षापासून येथे वास्तव्य करणाऱ्या झोपडपट्टी धारकांनी महिलेच्या मृत्यूनंतर रस्ता रोको करण्यात आले होते.
आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी, कैलास केंद्रे यांना येथील झोपडपट्टीवाशी यांच्यावतीने सदरील झोपडपट्टीचे पुनर्वसन करावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी झोपडपट्टी धारकांशी सुमारे एक तास चर्चा करून, सदरील रस्ता 45 मीटर किंवा 60 मीटर रुंद असा प्रस्ताव शासनाकडे आहे.
या दोन्हीचा निर्णय लवकरच होणार आहे, त्यामुळे तुमचे पुनर्वसन हे शासनाला करावेच लागणार आहे, त्यासाठी मी शासकीय स्तरावर लवकरात लवकर प्रयत्न करणार असून, शासन स्तरावर जे काही नियमात बसत आहे, त्यानुसार नगरपालिकेच्या आरक्षित जागेत तुमचे पुनर्वसन करण्याचे मी आज आश्वासन देतो, असे सांगितले.
यावेळी वाहतूक विभाग पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, माजी नगरसेवक अविनाश तापकीर, सचिन गिलबिले, माजी नगरसेविका रुक्मिणीताई कांबळे, मंगलाताई वेळकर, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष सदाशिव कांबळे, शुभम वेळकर, विनोद कांबळे, महेश वेळकर, आकाश दुनधव आदींसह झोपडपट्टीतील सुमारे 80 महिला व पुरुष उपस्थित होते. सदरलील रस्त्यावरील तांत्रिक अडचणीवर सुसंवाद साधून यातून लवकरच योग्य तो मार्ग काढला जाईल असे आश्वासन मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिले.