राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या वतीने आळंदीत सोमवारपासून बेमुदत उपोषण…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिराच्या शेजारील महाद्वार चौकात येत्या सोमवारी दि.१५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून इंद्रायणी नदी प्रदुषणाच्या गंभीर समस्येकडे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ पुणे, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या माध्यमातून बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे असे राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीचे प्रदेश संघटक मुबारक शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

          पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेसाठी हभप विठ्ठल महाराज मोरे, मोहनांनद महाराज पुरंदावडेकर, मुबारक शेख, राजूभाई इनामदार, दत्तात्रय साबळे, शांतीलाल लुनावत, रामदास रानवडे, सुनील ढोबळे, पृथ्वीराज थोरात, शफीक इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.

          उगमापासून लोणावळा, श्री क्षेत्र देहू आळंदी ते तुळापूर भिमा संगमापर्यंत इंद्रायणी नदीत सोडले जाणाऱ्या सांडपाण्यास शतप्रतिशत प्रतिबंध घालावा, तसेच दोन्ही तीरालगत नागरी व औद्योगिक घनकचरा डेपोस परवानगी असू नये, देहू आळंदी या तिर्थक्षेत्रातील नागरी घनकचरा योग्य ठिकाणी विल्हेवाट लावली जावी.

             इंद्रायणी नदी काठावरील औद्योगिक कंपन्यांचे दुषित सांडपाणी इंद्रायणी नदीत न सोडता त्या पाण्यावर प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प राबविण्यात यावेत अशा अनेक मागण्या पूर्ण होण्यासाठी आमरण उपोषणाचा मार्ग निवडला असल्याचे मुबारकभाई शेख यांनी सांगितले आहे.