डॉ. जगदिश वेन्नम

    संपादक

गडचिरोली, दि.12 डिसेंबर : जिल्हा मुख्यालयी शेतकऱ्यांच्या हक्काचा प्रशस्त असा ॲग्री मॉल उभा करण्यासाठी नियोजन करणार असल्याचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी कृषी महोत्सव 2022 च्या उद्घाटनावेळी सांगितले. आत्मा, कृषि विज्ञान केंद्र व कृषी विभाग गडचिरोली यांनी पुढाकार घेतला तर शेतकरी ॲग्री मॉल आपण येत्या दोन वर्षात उभारू असेही ते पुढे म्हणाले. कृषी विद्यालयाच्या प्रांगणात आत्मा, नाबार्ड व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कृषी महोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन विधान परिषद सदस्य आमदार रामदास आंबटकर, आमदार डॉ.देवराव होळी व जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मंचावर अतिरीक्त पोलीस अधीक्षक अनुज तारे, प्रकल्प संचालक आत्मा संदिप कऱ्हाळे, सहयोगी अधिष्ठाता कृषी विद्यालय छाया राऊत, प्रतिभाताई चौधरी, डीडीएम त्रुणाल फुलझेले, माविम चे सचिन देवतळे उपस्थित होते. यावेळी दीपप्रज्वलन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले.

 

             यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकरी मीणा म्हणाले, जिल्हयात मोठ्या प्रमाणात वनोपज उपलब्ध आहेत. तसेच येथील शेतकरी भाजीपाल्यासह नाविण्यपूर्ण पीके घेत आहे. जिल्हयातच मोठी बाजारपेठ उभी राहू शकते. कृषी विज्ञान केंद्राला सांगून येत्या दोन वर्षात चांगला शेतकरी ॲग्री मॉल उभारून विक्री बरोबरच शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती देणारे ठिकाण एकत्रित उभे करता येईल. ते पुढे म्हणाले, जिल्हयात विकासात्मक कामांना गती मिळत आहे. मोबाईल कनेक्टीव्हीटी वाढविली जात आहे. 544 टावर उभे करण्यास सुरूवातही झाली आहे. आर सी ई मधून रस्त्यांची उभारणी केली जात आहे. तसेच गोंडवाना जमीनाचा प्रश्न सुटला. एकल केंद्र स्थापन करून जिल्हयातील 1438 ग्रामसभांना सक्षम बनविण्यास सुरूवात झाली आहे. मागील मौसमात इतिहासातील सर्वात जास्त पाऊस पडला. यामूळे काही कामांना वेळ लागत आहे. जिल्हयातील सामान्य नागरिकांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान सुधारणे हाच प्रशासना प्रमुख हेतू आहे असे ते यावेळी म्हणाले.

 

उद्घटनीय भाषणात आमदार आंबटकर यांनी शेतकरी व सहयोगी गटाला शेतकरी महोत्सवातून फायदा होईल असे प्रतिपादन केले. जिल्हयात वेगाने विकास होत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यासाठी अधिकारी वर्गाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. अधिकारी वर्गाकडे कामाचा योग्य दृष्टीकोण असल्यास विकास कामांना गती येते. कृषी महोत्सवातून शेतकऱ्यांना ज्ञान तर मिळतेच पण आपले कौशल्य दाखविण्याची संधीही मिळते असे ते यावेळी म्हणाले.

 

शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी महोत्सव – आमदार डॉ.देवराव होळी

 

 सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी कृषी महोत्सव वरदान असून यातून त्यांना पीक वाढीसाठी, उत्पन्न वाढीसाठी मदत मिळणार आहे. म्हणून हा महोत्सव खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हिताचा महोत्सव असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ.देवराव होळी यांनी केले. ते म्हणाले, देशाच्या पंतप्रधानांनी प्रत्येक शेतकऱ्याला आत्मनिर्भर बनविण्याचे जाहीर केले. शेती आधारीत विविध उद्योगांची उभारणी करून, शेतीपूरक व्यवसायांना शेतकऱ्यांनी अंगिकारले पाहिजे. शेतकऱ्यांनी आता सेंद्रीय शेतीकडे वळणे खुप आवश्यक आहे. विना रासायनिक खतांचा वापर करता आज ना भाजीपाला उपलब्ध आहे ना फळे आहेत. आता शासनाकडून सेंद्रीय शेतीसाठी उत्पन्नापासून ते विक्रीपर्यंत शाश्वत प्रणाली सुरू करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. तरच सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढेल. बकरी पालन व कुक्कूटपालनातून शेतीला जोड व्यवसाय आज शेतकऱ्यांना चांगला पर्याय असल्याचे ते यावेळी म्हणाले. कृषी महोत्सवात सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवर शिबीरे घेण्यासाठी यावेळी त्यांनी सूचना केल्या.

 

गडचिरोलीतील विविध वनोपज, खाद्य पदार्थांचे आकर्षण

 

कृषी महोत्सवात 250 हून अधिक स्टॉल प्रदर्शन, विक्री व खाद्य पदार्थांचे लागले आहेत. या ठिकाणी पहिल्याच दिवशी प्रंचड गर्दी दिसून आली. या स्टॉलमधे जिल्हयासह आजूबाजूच्या जिल्हयातील बचत गटांनी सहभाग घेतला आहे. जिल्हयातील अनेक वनोपज, वेगवेगळे खाद्यपदार्थ, हस्तकला, शेती विषयक सयंत्र यांचे प्रदर्शन व विक्री या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हा महोत्सव दि.12 डिसेंबर पासून 16 डिसेंबर पर्यंत सर्वसामान्यांसाठी असणार आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com