दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : हवा थंड असली तरी वातावरण तापले आहे. महाराष्ट्रातील एक लाख युवकांना रोजगार मिळवून देणारा तळेगावतील वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प भाजपप्रणीत शिंदे खोके सरकारने गुजरातला पाठवला यांनी एकच नाही तर शेकडो प्रकल्प गुजरातला पाठवले.
त्यांनीच आपल्या पाठीत खंजीर खुपसला, आपला पक्ष फोडला, शरद पवार यांचा पक्षच नाही तर घर फोडले, पण हे एवढ्यावर थांबले नाहीत तर त्यांनी आपला महाराष्ट्र फोडला, महाराष्ट्र लुटला, महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळवणाऱ्या गद्दारांना या निवडणुकीत धडा शिकवा, असे जाहीर आवाहन युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी येथे केले.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचारार्थ आळंदी येथे माजी पर्यावरणमंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी पक्षाचे उपनेते सचिन आहिर, जगन्नाथ शेवाळे, अतुल देशमुख, सुधीर मुंगसे, नितीन गोरे, विजया शिंदे, भगवान वैराट, राजूशेठ जवळेकर, विजय शिंदे, बबनराव कुऱ्हाडे, रोहीदास तापकीर, उत्तम गोगावले, शैला तापकीर, रमेश गोगावले, विलास कुऱ्हाडे, अनिता झुजम यांच्यासह सर्वपक्षीय आघाडीचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, भाजपने गौरी लंकेशच्या खुन्याला आपल्या पक्षात घेतले, बलात्काराच्या पक्षाच्या नेत्यांना लाडका भाऊ समजू का, मग दीड हजारांमध्ये तुमचे मत विकणार आहात का, असा सवाल उपस्थित केला. आपण लाडकी बहीण योजना बंद करणार नाही तर दुप्पट तीन हजार रुपये देणार आहोत. वर्षाला मोफत सहा गॅस सिलिंडर देणार आहोत, महिलांना मोफत बससेवा देणार आहोत. महिला, युवक, शेतकरी भाजपसोबत नसल्याचे लोकसभेत लक्षात आल्याने त्यांनी या योजना आणल्या आहेत.