दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : येथील इंद्रायणी नदी घाटावरती विश्वशांती केंद्राजवळ हभप भगवान महाराज कोकरे यांनी(दि.१)नोव्हेंबर पासून भव्य राष्ट्र कल्याण सामुदायिक जन आंदोलन आमरण उपोषण सुरु केले होते आज बाराव्या दिवशी आळंदी, पंढरपूर व देहू येथील अभ्यासू वारकरी महाराजांच्या उपस्थितीत भाजपचे माजी राज्यमंत्री संजय भेगडे हे येत्या दहा दिवसांच्या आत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सदर मागण्या बाबत बैठक बोलावली जाईल असे आश्वासन देत भेगडे यांच्या विनंतीला मान देत आमरण उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, भाजप जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, मिलिंद एकबोटे, प्रकाश महाराज जवंजाळ, पुरुषोत्तम महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, बबनराव कुऱ्हाडे, राम गावडे, राजाभाऊ चोपदार, नरहरी महाराज चौधरी, श्याम महाराज राठोड, पांडुरंग महाराज शितोळे, अजित वडगावकर, किरण येळवंडे, राहुल चव्हाण, महंत मौनी महाराज, सचिन गिलबिले, पांडुरंग वहीले, ज्ञानेश्वर बनसोडे, संकेत वाघमारे तसेच पिंपरी चिंचवड पोलिस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी व महाराज मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.
समान नागरी कायदा, आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण द्यावं, इंद्रायणी नदीला प्रदूषणातून मुक्त करावं, शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव द्यावा अशा विविध मागण्यांबाबत ते इंद्रायणी नदी काठी भगवान महाराज कोकरे हे उपोषणाला बसले होते.