ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली, दि. १२ : भारतात मोठ्या प्रमाणावर युवकांची संख्या आहे. त्यांना उच्च दर्जाचे कौशल्य विकास प्रशिक्षण दिल्यास मोठ्या औद्योगिक आस्थापनामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. युवकांच्या कौशल्य विकास प्रशिक्षणावर भर देण्याचा शासनाचा मानस आहे. त्यातून रोजगार निर्मिती व युवक सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे. हा हेतू विचारात घेता महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील युवक-युवतींना उच्च दर्जाचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती), नागपूर ने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी भारत सरकारच्या केमिकल मंत्रालयाची प्रशिक्षण संस्था असलेल्या सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरींग व टेक्नोलॉजी (सिपेट) छ. संभाजीनगर या संस्थेसोबत उच्च दर्जाचे तांत्रिक कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी महाज्योतीने सामंजस्य करार केला आहे.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे ( महाज्योती) व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले व सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरींग व टेक्नोलॉजी (सिपेट) चे संचालक ए.के. राव यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यावेळी महाज्योतीचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रशांत वावगे, प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे, सीपेट संस्थेचे वरिष्ठ टेक्निकल अधिकारी मोसम चौधरी, लेखाधिकारी भारत देशमुख तसेच लेखा सहाय्यक निलेश पिंपळे आदी उपस्थित होते.
सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरींग व टेक्नोलॉजी (सिपेट), या ठिकाणी महाज्योतीच्या 600 उमेदवारांना निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मशीन ऑपरेटर इंजेक्शन मोल्डिंग तसेच मशीन ऑपरेटर प्लास्टिक प्रोसेसिंग या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदरचे प्रशिक्षण हे मोफत व निवासी स्वरूपाचे असून 6 महिने कालावधीचे असणार आहे.
सदर प्रशिक्षणात इंजेक्शन मोल्डिंग व प्लास्टिक प्रोसेसिंग याबाबतचे थेअरी तसेच प्रात्यक्षिक प्रशिक्षण अत्याधुनिक कार्यशाळेत देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी लेखा सहाय्यक निलेश पिंपळे मो. 93256 87910 व वरिष्ठ टेक्निकल अधिकारी श्रीमती मोसम चौधरी मो.97771 33903 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन महाज्योती व सिपेटद्वारे करण्यात आलेले आहे.