पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अधिक प्रमाणात वृक्षारोपण करणे गरजेच : वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार 

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

पुणे: पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत असताना तो राखण्यासाठी अधिक प्रमाणात वृक्षारोपण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.वनपरिक्षेत्र कार्यालय, शिरोली खेड येथे वनरक्षक निवासस्थान, वन्यजीव रुग्णवाहिका लोकार्पण, अमृतवन निर्मित रोपवन वृक्ष लागवड आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झालेल्या व्यक्तींच्या वारसास अर्थसहाय्य प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.

       यावेळी पुणे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, उपवनसरंक्षक अमोल सातपुते, सहायक वनसरंक्षक संदेश पाटील, अमित भिसे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप रौंधळ आदी उपस्थितीत होते.

        वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, पर्यावरणाचा समतोल वेगाने बिघडत असताना वन विभागाच्यावतीने वृक्षलागवडीचे विविध उपक्रम हाती घेण्यात आले. वनक्षेत्राची सेवा करण्याची जाणीव मनात ठेवत मागील वर्षांपेक्षा पुढीच्या वर्षी अधिकची झाडे लावण्याचा वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी करीत असतात. त्यामुळे मागील ५ वर्षांत वृक्षलागवडीच्या माध्यमातून देशात २ हजार ५५० चौरस किलोमीटरचे हिरवे आच्छादन वाढविण्यात यश आले आहे. याचे संपूर्ण श्रेय वन विभागातील अधिकारी, कर्मचारी, वनप्रेमी, सामाजिक संस्था आणि नागरिकाला जाते. या कामाची दखल घेत हा उपक्रम देशात राबविण्याचा संकल्प देशपातळीवर करण्यात आला आहे. 

           राज्यात अमृत वन उद्यान करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज राज्यातील पहिल्या अमृत वन उद्यान उभारण्याचा शुभारंभ करण्यात आला आहे. पारंपरिक आयुर्वेदाच्या ज्ञानाला यामुळे चालना मिळणार आहे. या उद्यानात औषधीयुक्त, ऑक्सिजन देणारे असे ४०० वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. भविष्यातील पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनी किमान एक तरी झाड लावून इतरांना प्रोत्साहित करावे, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.

         उपवनसरंक्षक सातपुते यांनी जुन्नर वन विभागात सुरु असलेल्या कामाविषयी माहिती दिली.यावेळी जखमी वन्यप्राण्याला तातडीने व वेळेवर उपचार मिळावे यासाठी वन्यप्राणी रुग्णवाहिका आणि ५ हेक्टरमध्ये ठिबक सिंचन करुन दिल्याबद्दल बोस कंपनी चाकणचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश चिंतावर, रोटरी क्लबचे संजय प्रधान आणि रेमंड कंपनीच्या रंजना गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.

         जुन्नर वनविभाग अंतर्गत येणाऱ्या सात वनपरिक्षेत्रातील एकूण २५४ रेस्क्यु सदस्यांना प्रातिनिधिक स्वरुपात ३९९ रुपयात १० लाख रुपयांचे विमा छत्र व गणवेश वाटप करण्यात आले. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अजय चिंतामण जठार रा. धुवोली यांचे वारसदार चिंतामण जठार यांना १० लक्ष रुपये आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात आले.

       हुतात्मा राजगुरु अमृत वन उद्यान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांच्या निमित्ताने हुतात्मा राजगुरु अमृत वन उद्यानामध्ये महाराष्ट्रातील दुर्मिळ प्रजाती, प्रमुख वृक्ष औषधी वनस्पती असे ४०० वृक्ष लावण्यात येणार आहे. पुढील सात वर्षात तेथे पर्यटनासाठी पॅगोडा, मनोरे, निसर्ग मार्ग, हर्बल गार्डन, रोप वाटिका, पक्षांची घरटी व पक्षी स्नानगृह तसेच शारीरीक आरोग्य वर्धनासाठी निसर्ग पायवाट आदी घटकांचा समावेश करण्यात येणार आहे.

     वनरक्षक निवासस्थान आणि वनकोठडी वनपरिक्षेत्र कार्यालयाचे आवारात, पुणे- नाशिक महामार्गालगत वनवसाहत शिरोली येथे वनरक्षक चास वनरक्षक कमान व वनरक्षक गुळाणी असे एकूण तीन वनरक्षक निवासस्थानाचे बांधकाम करण्यात आले आहे. राज्य कॅम्पा योजनेअंतर्गत वनपरिक्षेत्र खेडच्या हद्दीत वनगुन्हे, वनअपराध करणाऱ्या आरोपींना शासन व्हावे व वनगुन्ह्यास आळा बसण्यासाठी वनकोठडी बांधण्यात आली आहे.यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती भगवान पोखरकर, सागर कोल्हे, आदर्श विद्यालयाचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.