दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राजगुरूनगर (ता. खेड) येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू वाडा स्मारक येथे ‘जागतिक वारसा नामांकनाचे आम्ही साक्षीदार’ या स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, उप विभागीय अधिकारी अनिल दौंडे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.विलास वाहणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, तहसीलदार ज्योती देवरे, गट विकास अधिकारी विशाल शिंदे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ अंतर्गत जागतिक वारसा नामांकनासाठी प्रस्तावित केले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील शिवनेरी, लोहगड, राजगड या किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. नामांकनादरम्यान किल्ल्यांच्या प्रचार-प्रसारासाठी जिल्हा प्रशासन आणि पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पवार यांनी या मोहिमेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या स्वाक्षरीसाठीच्या फ्लेक्सवर स्वाक्षरी केली. या गड किल्ले जागतिक वारसा स्थळ नामांकन जनजागृती मोहिमेत नागरिकांना सहभागी करुन घेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असून त्यापैकी हा एक उपक्रम आहे, असे पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. वाहणे यांनी सांगितले.