“जात फॅक्टर” बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातही व्हायरल?…

           काल परवा कुणबी बहूल ब़म्हपूरी विधानसभा क्षेत्रात कुणबी समाज महाअधिवेशनातून खा.प्रतिभाताई धानोरकर यांनी “कुणबी कार्ड” मतदारांच्या हाती देताच आता हा ‘जात फॅक्टर’ व्हायरस बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातही पसरल्याचे चित्र बघायला मिळत असल्याची चर्चा जोमात असून या माळी समाज बहूल विधानसभा क्षेत्रात या समाजातील उमेदवारीची मागणी आघाडीकडे होणार यात शंका उरलेली दिसत नाही.

         असे झाले तर भुमिपुत्र ब्रिगेडच्या प्रमुख डॉ.अभिलाषा गावतुरे ( बेहेरे) यांचेकडे महाविकास आघाडी आग्रह करू शकेल असे राजकीय विश्लेषक बोलताना दिसतात.

****   

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रावर आघाडी घटक पक्षांची नजर?

           गत २० वर्षात बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांना विजय तर सोडा ना.मुनगंटीवारांच्या आसपासही भटकता आलेले दिसत नाही.

          २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भा.ज.पा.उमेदवार माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात झपाटून मार खाल्ला मात्र पुढील सहा महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत भा.ज.पा.उमेदवार ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मोठ्या फरकाने हे विधानसभा क्षेत्र काबीज करून आपली पकड या क्षेत्रावर कायम असल्याचे दाखवून दिले आहे.

          नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दस्तुरखुद्द मुनगंटीवारांना त्याच्याच विधानसभा क्षेत्रात मतदारांनी तगडा झटका देत चिंतन करायला लावले आहे.

            ना.सुधिरभाऊ नव्या जोमाने आपल्या अस्तित्वासाठी कामाला लागले आहेत. मात्र या विधानसभा क्षेत्रात मोठ्या फरकाने भा.ज.पा.उमेदवार चित झाल्याने सतत दोन नंबरवर राहणाऱ्या कांग्रेसला गुदगुल्या सुरू झाल्या असून संधीचे सोने करण्यासाठी अनेक जण बाशिंग बांधून मैदानात उतरले आहेत. मुनगंटीवारांना भारी पडणारा ‘लाडका’ उमेदवार कोण?

           यासाठी काँग्रेसचे शोधपथक शोधमोहीम राबवीत आहेत. मात्र महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दोन विधानसभा क्षेत्राची मागणी तेवढयाच ताकदीने वरच्या स्तरावर लावून धरल्याची चर्चा पुढे येऊ लागल्याने उत्सुक उमेदवार संभ्रमात राहिल्यास नवल नसावे असे जाणकारांचे मत आहे.

         भविष्यात असे घडले तर आघाडीच्या घटकपक्षाना कोणते दोन विधानसभा क्षेत्र सोडण्यात येतील? हा सवाल कायम आहे. मात्र राजकीय विश्लेषकांचे मते जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रातील जे क्षेत्र गत २० वर्षांपासून काँग्रेस खेचता आलेल्या नाहीत अशा दोन क्षेत्राचा विचार होऊ शकतो.

         चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर व बल्लारपूर हे दोन विधानसभा क्षेत्र यात बसतात. यातील चंद्रपूर विधानसभा क्षेत्र अनुसूचित जाती करीता राखीव आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात सरळ लढतीत काँग्रेसच काहीही टक्कर देऊ शकते हेही तेवढेच खरे आहे.

          कुठल्या दोन विधानसभा आघाडीच्या घटकपक्षांच्या माथी मारल्या जातील हे नंतरच कळेल मात्र काँग्रेस हायकमान उमेदवारीचे बाशिंग बाधतांना किंबहुना ‘लाडका’ उमेदवार शोधताना फार सजग राहणार असल्याचे बोलले जाते.

        गत लोकसभेपासून ‘ओबीसी फॅक्टर’ एक्टिव्ह झाल्याचे चित्र दुर्लक्षित करता येऊ शकतं नाही. मराठा आरक्षण आंदोलन सुरू झाल्या पासून जात फॅक्टर वेगाने पुढे सरकला आहे. लोकसंख्येनुसार वाटा मिळायलाच हवा असा हेका दस्तुरखुद्द राहूल गांधींनी वारंवार धरला आहे.

         राजकीय वाट्यात त्या क्षेत्रातील ‘कास्ट कार्ड’ चा विचारही काँग्रेस करेल.आघाडीच्या घटकपक्षांतील शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे दोन्ही पक्ष चंद्रपूर व बल्लारपूर विधानसभा क्षेत्रावर नजर ठेवून आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे गत दोन वर्षांपासून या क्षेत्रात बिऱ्हाड मांडून बसले आहेत.

           त्याचा कामधंदा व राजकारण इथूनच सुरु आहे हे चित्र बोलके आहे. तिकडे चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात अनेक. कांग्रेसी राष्ट्रवादी (शरद पवार) गटांशी जुळवून घेत असल्याचे चित्र आहे.

      बल्लारपूर विधानसभा क्षेत्र माळी समाज तसाच ओ.बि.सी मतदार बहूल क्षेत्र आहे. भा.ज.पा.उमेदवार जवळपास निश्चित आहेत. महाविकास आघाडी बाशिंग बांधून कुणाला सोडते हे बघायला चंद्रपूर जिल्हा मात्र फार उत्सुक आहे.

          काल परवा ब़म्हपूरी येथील कुणबी समाज अधिवेशनात खा.धानोरकर यांनी कुणबी मतदारांना कुणबी उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

           कदाचित बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात खासदारांच्या आवाहनाचा व्हायरस वाढला तर या माळी समाज बहूल क्षेत्रात माळी समाज बांधव काँग्रेस व घटक पक्षांवर उमेदवारीसाठी दबाव आणू शकतात असेही जाणकार बोलताना दिसतात.

                राजयोग

                 प्रा.महेश पानसे.