उमेश कांबळे ता प्र भद्रावती
अपघातावर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे अनेक जनजागृतीपर कार्यक्रम हाती घेण्यात येऊनही रस्त्यावरील अपघातांची संख्या सारखी वाढतच चालली आहे. त्यामुळे अपघातांचे हे सत्र थांबविण्यासाठी पोलीस प्रशासन हे ॲक्शन मोडवर आले असून पोलिसांतर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनात शहरात “मिशन अलर्ट” ही मोहीम सुरू करण्यात येत आहे.
या मोहिमेंतर्गत शहरात विविध ठिकाणी नाकेबंदी करून दुचाकी तथा इतर वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. यात वाहन चालक दोषी आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी आपल्या वाहनांचे कागदपत्रे जवळ बाळगावे, विना हेल्मेटने वाहन चालवू नये, दारू पिऊन वाहन चालवू नये व वाहतुकीचे सर्व नियम पाळावेत असे आवाहन भद्रावतीचे ठाणेदार बिपिन इंगळे यांनी केले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून परिसरात अपघातांचे प्रमाण सारखे वाढत चालले आहे. यावर अंकुश लावण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे अनेक जनजागृतीपर कार्यक्रम हाती घेऊन वाहनधारकात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या सर्व उपक्रमांकडे वाहनधारकांनी दुर्लक्ष केल्यामुळे अपघात कमी होण्याऐवजी त्यात वाढ होत चालली आहे. त्यामुळे आता पोलिसांनी याबाबत कडक पावले उचलली असून मिशन अलर्ट ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे आता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.