गांजा तस्करावर मोठी कारवाई… — मुरुमगाव येथे कारमधु २० लाखांचा गांजा जप्त.. — पोलीसांनी सापळा रचून तीन आरोपींना केली अटक…

प्रितम जनबंधु

संपादक 

         प्राप्त माहितीनुसार धानोरा तालुक्यातील मुरुमगाव जवळ गांजाची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींवर मुरुमगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत आरोपींकडून 20 लाख 98 हजार 800 रुपयांचा 138 किलो 580 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ते छत्तीसगड राज्यातून गांजाची तस्करी करत होते.

         पोलिसांनी गोपनिय माहितीच्या आधारावर ही कारवाई केली असल्याचे समजते. MH-04-CM-2515 या क्रमांकाच्या सिल्व्हर रंगाच्या होंडा सिटी कारमधून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती मुरुमगाव पोलिसांना मिळाली. छत्तीसगड राज्यातून सावरगाव-मुरुमगाव मार्गे गडचिरोलीकडे ही गाडी येत होती. गाडीतील तीन जणांकडे गांजा हा मादक पदार्थ असल्याचं पोलिसांना समजलं, त्यानंतर धानोरा तालुक्यातील मुरुमगाव पोलिसांनी कटेझरीकडे जाणाऱ्या रोडसमोरील बस स्थानकासमोर सापळा लावून सदर कारला हात दाखवून थांबवलं आणि गाडीची तपासणी केली.

        पोलिसांनी कार थांबवल्यानंतर त्या कारमध्ये पिवळ्या रंगाची चुंगळी, सिल्व्हर रंगाची चुंगळी आणि पांढऱ्या रंगाची चुंगळी असे एकूण 3 चुंगळ्यांमध्ये एकूण 138 किलो 580 ग्रॅम वजनाचा गांजा (अंमली पदार्थ) सापडला, या गांजाची अंदाजे किंमत 13 लाख 85 हजार 800 रुपये आहे. गांजा तस्करी करताना वापरण्यात आलेली चारचाकी, सिल्व्हर रंगाची होंडा सिटी कार जवळपास 7 लाख रुपयांची आहे. तसेच, दोन आरोपींकडे मिळालेल्या मोबाईलची किंमत 13 हजार रुपये आहे, असा एकूण किंमत 20 लाख 98 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल पोलीस मदत केंद्र मुरुमगाव येथे जमा करण्यात आला आहे.

         मुरुमगाव पोलिसांच्या कारवाईत गांजा तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तीनही आरोपी हे मुंबईचे राहणारे आहेत, पोलीसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरोधात गांजा तस्करी संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तिन्ही आरोपी मुंबईचे रहिवासी असल्याचे माहिती मिळाली आहे. उमर फैय्याज अहमद शेख, राकेश राजु वरपेटी, शहबाज सरवर खान असं या तिन्ही आरोपींचे नाव आहेत.