विवेक रामटेके

बल्लारपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी

 

कोठारी: कोठारी तालुक्याची मागणी मागील तीस ते पंचेंविस वर्षापासून प्रलंबित असून बल्लारपूर तहसीलदारांनी ९ जून २०२२ ला काटवली रस्त्यावर अतिरिक्त तहसीलदार कार्यालयासाठी जागा राखीव केल्याचा फलक लावला आहे. कोठारीकरांना अतिरिक्त तहसीलदार कार्यालयाचे गाजर निवडणुकीच्या तोंडावर देत तहसील अजून दूर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

कोठारी तालुका घोषित करून परिसरातील वीस ते तीस गावकऱ्यांच्या तालुक्याच्या अंतरावरील फेऱ्या कमी करून त्यांची कामे सुलभ होतील असा आशावाद वर्तविण्यात आला होता. तालुक्याची मागणी कोठारीकरांनी सतत लावून धरली होती. त्यासाठी धरणे,आंदोलने,मोर्चे करण्यात आले होते. बल्लारपूर विधान सभेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी गावकऱ्यांच्या मागणीची दखल घेत तालुका करण्याचे आश्वासन २०१४ पूर्वीच दिले होते. त्यांनी त्याची वाच्छता अनेक कार्यक्रमातून केली.अखेर २०१४ च्या निवडणुकीपूर्वी कोठारीत नायब तहसील कार्यालयाचे उदघाटन केले. मात्र महिनाभरात नायब तहसील कार्यालय बेपत्ता झाले. त्यात काम करणारे अधिकारी अचानक नाहीसे झाले. ते आजपर्यंत उघडले नाही यावर गावकर्यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवीत गावकऱ्यांची निवडणुकीत केवळ मते लाटण्यासाठी उपयोग करून धूळफेक करीत तालुक्याची मागणी दुर्लक्षित केल्याची भावना निर्माण झाली होती. पुन्हा २०१९ च्या निवडणुकीत कोठारी अप्पर तहसील कार्यालय मंजूर केल्याचा देखावा निर्माण करण्यात आला व अप्पर तालुक्याचे फलक घेऊन शासकी यंत्रणा कोठारीत धडकली. अप्पर तालुक्याचे कार्यालय शासकीय विश्राम गृहात उघडण्याची योजना होती. परंतु लगेचच आचारसंहिता लागल्याने कार्यालय उघडण्यात आले नाही. त्यानंतर पाच वर्षापर्यंत त्याकडे पहिल्या गेले नाही. कोठारी तालुका करण्याचे स्वप्न गावकर्यांना दाखवायचे व मताचा जोगवा मागून आपली झोळी भरल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्याचे कारस्थान आजपर्यंत सुरु असल्याने गावकर्यात कोठारी तालुका होण्याचे स्वप्न धूसर झाल्याच्या भावना निर्माण झाल्या.

अखेर ९ जून २०२२ ला कोठारी येथे काटवली रस्त्यालगत तहसीलदार बल्लारपूर यांचे आदेशान्वये सर्व्हे नं.२४ आराजी ०.५७ हेक्टर आर. शासकीय जमीन अतिरिक्त तहसील कार्यालय कोठारी करीता राखीव ठेवण्यात आली असून त्यावर कोणीही अतिक्रमण करू नये अन्यथा कारवाई करण्याचे सूचना फलक लावण्यात आले आहे. सदर प्रकार नागरिकांना माहीत होताच व त्या जागेवर फलक पाहून गावात व जनमानसात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

सद्या जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्राम पंचायतीच्या तसेच २०२४ ला विधान सभेच्या निवडणुका होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. आधी जिल्हा परिषद,पंचायत समिती नंतर ग्राम पंचायतीच्या निवडणुका तोंडावर आल्या असून कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकित मतदारांना आकर्षित करण्याकरिता व दिलेला शब्द पूर्ण करीत असल्याची भावना मतदारात रुजविण्यासाठी कोठारीत अतिरिक्त तहसील कार्यालय होण्याचा संदेश देण्याचा फाजील प्रयत्न तसेच यामागील स्पष्ट उद्देश दिसून येत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आधी बल्लारपूर तहसील अंतर्गत कोठारीत नायब तहसील कार्यालय त्यानंतर अप्पर तहसील कार्यालयाचा खटाटोप आता ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त तहसील कार्यालयाचे फलक लावून नेहमीप्रमाणे कोठारीकरांच्या भावनांशी खेळखंडोबा करून जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम होत असल्याच्या चर्चांना उधाण आले आले आहे.

बल्लारपूर विधान सभेचे आमदार म्हणून आ.सुधीर मुनगंटीवार मागील वीस वर्षांपासून प्रतिनिधित्व करीत आहेत. याआधी त्यांनी राज्याचे अर्थ,नियोजन व वने मंत्री म्हणून यशस्वी कार्यभार सांभाळला आहे. त्या वेळेस त्यांनी मनात आणले असते तर कोठारी व परिसरातील जनतेच्या भावनांना पूर्णविराम देता आला असता. मात्र त्यांना कोठारी तालुका निर्माण करायचा आहे की केवळ तालुक्याचे गाजर दाखवीत जनतेची मते झोळीत ओढायची आहेत हे आधी स्पष्ट करण्याची मागणी होत आहे.

आ. मुनगंटीवार बल्लारपूर विधान सभेमध्ये असणाऱ्या तालुक्याचा व गावाचा विकास तसेच क्षेत्रातील नागरिकांच्या मूलभूत समस्या निस्तारण्याचा प्रयत्न नियमित करीत असतात. मूल, पोंभूर्णा व बल्लारपूर तालुक्यातील गावाचा झालेला विकास जिवंत उदाहरण आहेत. त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करतात ही त्यांची ख्याती आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने जननायक,लोकनेता अशी प्रसिद्धी जनतेंनी दिली आहे. कोठारी तालुका निर्माण होणार ही काळ्या दगडावरची रेष असून तालुक्याची निर्मिती केल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी ग्वाही अनेक कार्यक्रमातून व जाहीर सभेतून दिली आहे. निवडणुका मागून निवडणूक होत आहेत. आता ते राज्याचे वने,सांस्कृतिक मंत्री आहेत. महाराष्ट्रातील वजनदार नेते म्हणून प्रचलित आहेत. अशात कोठारी तालुका घोषित करून कोठारीकरांना गोड बातमी देण्याची अपेक्षा करण्यात येत आहे. मात्र कोठारीत अतिरिक्त तहसील कार्यालयाचा फलक लागल्याने नागरिकांच्या तालुक्याच्या आशा आणखी काही वर्षे पूर्ण होणार नाही हेच यावरून सिद्ध होत आहे. मागणी तालुक्याची असून ती पूर्ण न होता नायब,अप्पर, आता अतिरिक्त तहसील कार्यालय अशा प्रकारचे गाजर कोठारी व परिसरातील मतावर डोळा ठेऊन तालुक्याचे आमिष दाखविण्याचा प्रकार तर नाही ना अशा शंकांना पेव फुटला आहे. नागरिक चौकाचौकात,होटेल, पान,चहा टपर्यावर मोठ्या प्रमाणात उलटसुलट चर्चा करीत सुटले आहेत. आता कोणतेही कार्यालय नको, द्यायचे असेल तर तहसील   कार्यालयच  द्या अशी मागणी  करू लागले आहेत.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com