आ.सुधाकर अडबाले यांचे शिक्षकांप्रती कार्य प्रशंसनीय… — माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे यांचे प्रतिपादन… — “सुधाकरपर्व” विशेषांक प्रकाशन सोहळा थाटात संपन्न…

प्रेम गावंडे

 उपसंपादक

दखल न्युज भारत

        चंद्रपूर : आमदार सुधाकर अडबाले हे निवडून आल्‍यापासूनच शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रश्‍नांना घेऊन सतत संघर्ष करीत आहे. सभागृहात व सभागृहाच्या बाहेरही त्‍यांच्या समस्‍या सोडविण्यासाठी बैठका घेऊन नागपूर विभागच नव्‍हे तर अमरावती विभागात सुद्धा बैठका घेत आहेत. गेल्‍या दीड वर्षांच्या कार्यकाळातच त्‍यांनी शिक्षक – कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्‍न मार्गी लावल्‍याने त्‍यांचे हे शिक्षकांप्रती कार्य प्रशंसनीय असल्‍याचे मत माजी आमदार व्‍ही. यू. डायगव्हाणे यांनी व्यक्त केले.

          शिक्षकांच्या हक्कांसाठी लढणारे कणखर नेतृत्व, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या वाढदिवसानिमित्त त्‍यांच्या आजवरच्या विधिमंडळ कार्यकाळातील केलेल्या कार्याचा आढावा घेणारा “सुधाकरपर्व” विशेषांक (पुस्तक) प्रकाशन सोहळा मोठ्या थाटात नुकताच पार पडला. याप्रसंगी सोहळ्याच्या अध्यक्षस्‍थानावरून ते बोलत होते.

            यावेळी प्रमुख अतिथी म्‍हणून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अरविंद देशमुख, प्रांतीय उपाध्यक्ष जयप्रकाश थोटे, रमेश काकडे, भूषण तल्‍हार, महादेव पिंपळकर, गहोकर, केशवराव ठाकरे, श्रीहरी शेंडे, विष्णू इटनकर, महेंद्र सालंकार, अजय लोंढे, रवींद्र नैताम, शमशेर पठाण, प्रभाकर पारखी, सुरेंद्र अडबाले, अनिल गोतमारे, विठ्ठल जुनघरे, संजय वारकड, अविनाश बडे, ओमप्रकाश गुप्‍ता, संदीप मांढरे, रामकृष्ण जीवताेडे आदींची उपस्‍थिती होती.

             चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आमदार सुधाकर अडबाले यांच्या वाढदिवसानिमित्त या पुस्तिकेचे प्रकाशन माजी आमदार व्‍ही. यू. डायगव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना माजी आमदार व्‍ही. यू. डायगव्हाणे यांनी आमदार अडबाले यांच्या कामाचे कौतुक करत म्हटले की, “अडबाले यांनी अल्पावधीतच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या सोडवून दाखवल्या आहेत. ही पुस्तिका या कार्याचा आढावा घेण्यासाठी एक उत्तम माध्यम ठरेल.”

        आमदार सुधाकर अडबाले यांच्या एक वर्षाच्या कार्यकाळात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावल्याबद्दल माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे यांनी प्रशंसा केली आहे. त्यांनी यासंदर्भात प्रकाशीत झालेली “सुधाकरपर्व” पुस्तिका प्रेरणादायी ठरेल, असे मत व्यक्त केले.

         मला विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात पाठविणाऱ्या माझ्या शिक्षकवृंदांचे ऋण फेडण्यासाठी मी सदैव तत्पर असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कायमच कटिबध्द राहील, अशी ग्‍वाही आमदार अडबाले यांनी याप्रसंगी दिली.

          या प्रकाशन सोहळ्याला विदर्भातून संघटनेचे पदाधिकारी, सदस्‍य व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्‍थित होते.