वणी : परशुराम पोटे
येथिल न.प.च्या शाळा क्रमांक १ मध्ये दुसऱ्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा शाळेत पडल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
ओम निलेश पचारे (७)रा. भोई पुरा वार्ड वणी असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे.
ओम दररोज प्रमाणे शनिवारी दि.९ जुलै ला शाळेत गेला होता. शाळेत खेळतांना तो खाली पडला असावा व त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला असावा असे शाळेच्या मुख्याध्यापकाचे म्हणने आहे. दरम्यान त्या चिमुकल्या विद्यार्थ्याला गंभीर मार लागुनही मुख्याध्यापक सह एकाही शाळेच्या शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला त्याच्या घरी पोहोचविण्याचे सौजन्य न दाखविता उलट एका विद्यार्थ्यीनी सोबत त्या गंभीर मार लागलेल्या विद्यार्थ्याला त्याच्या घरी पोहोचविण्यात आले. पालकांनी प्रथम उपचारासाठी वणीतील एका रुग्णालयात दाखल केले होते परंतु डोक्याला गंभीर मार असल्याने पुढील उपचारासाठी त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले होते. चंद्रपूर येथे एका रुग्णालयात उपचार सुरू असतांना आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्या चिमुकल्या विद्यार्थ्याने अखेरचा श्वास घेतला. या घटनेची माहिती वणी शहरात पोहचताच युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, स्थानिक माजी नगरसेविका सौ.आरती वांढरे, माजी नगरसेवक पि.के.टोंगे व काही नगर परिषदेचे कर्मचारी शाळा क्रमांक १ मध्ये पोहोचले होते. दरम्यान चंद्रपूर वरुन त्या विद्यार्थ्याचा मृत्यूदेह सरळ शाळेत आणण्यात आला होता. दरम्यान परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शिक्षकांच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात येत असल्याने वेळीच प्रसंगावधान राखून पोलीसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी वणीच्या ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.