दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : पहाटेचं आल्हाददायक वातावरण, दिंड्यांमधून ऐकू येणारे अभंगांचे स्वर व दर्शनासाठी भाविकांनी केलेली गर्दी असं चित्र सोमवारी अलंकापुरी नगरीत दिसले. निमित्त होते, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे. दर्शन मंडप आजोळघरातील येथील मुक्काम संपवून सोहळा विद्येचे माहेरघर पुण्याकडे मार्गस्थ झाला.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रविवारी सायंकाळी प्रस्थान सोहळा करून आजोळघरात मुक्कामी पोचला होता. रात्री पालखी मुक्कामी त्यानंतर जागर झाला. सोमवारी (ता. १२) पहाटे पाच वाजता सोहळा विद्येचे माहेरघर पुण्याकडे मार्गस्थ झाला. तत्पूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पादुंकावर गांधी परीवाराकडून महापूजा झाली. काकड आरती झाली. त्यानंतर पालखी आळंदीकर ग्रामस्थांनी खांद्यावर घेऊन नगरपरिषद चौकातील आकर्षक फुलांनी सजवलेल्या चांदीच्या रथात पालखी विराजमान झाली. यावेळी आळंदी नगरपरिषदेच्या वतीने प्रशासक वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी पालखीचे स्वागत केले, यावेळी नगरपरिषदेचे माजी पदाधिकारी, अधिकारी, आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी माऊलींच्या पालखीच्या चांदीच्या रथाचे सारथ्य मुख्याधिकारी कैलास केंद्रे, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील, बैल जोडीचे मानकरी माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले, संतोष भोसले आणि रोहित भोसले यांनी केल. यावेळी माऊलींच्या पालखीला निरोप देण्यासाठी आळंदी आणि परीसरातील नागरीकांना गर्दी केली होती, पालखी मार्गावर विविध संघटना आणि संस्थेच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले.
पहाटेपासूनच नागरिक आळंदी पुणे महामार्गावर दुतर्फा थांबलेले होते. नगरपरिषद चौकातून सोहळा पुणे महामार्गाने पुण्याकडे निघाला. नऊच्या सुमारास पालखी थोरल्या पादुका येथील मंदिरात सकाळच्या विसाव्यासाठी थांबली. दिंड्याही थांबल्या. तिथे न्याहरी केल्यानंतर सोहळा पुढे निघाला.
आळंदी पासून रस्त्याच्या दुतर्फा थांबून भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. पारंपारिक वेशभूषा केलेले नागरिक व महाविद्यालयीन तरुणाई पालखीजवळ सेल्फी व फोटो काढताना दिसले. स्थानिक नागरिकांकडून वारकऱ्यांना चहा व नाश्ताचे वाटप केले. भक्तीमय वातावरणात अलंकापुरीतील ग्रामस्थ व भाविकांनी पालखीला निरोप दिला.
दरम्यान, आळंदी पालिकेतर्फे आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली. पर्यावरणपूरक, प्लास्टिक मुक्त, हरितवारी करण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देताना प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र समन्वयकांची नेमणूक केली होती. पालखी सोहळ्यासोबत पिण्याच्या पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका व अग्निशमन बंब आणि जवान आहेत.