सजग ग्राहक बना आणि बालकांचा आनंद द्विगुणित करा :- दीपक देशपांडे… — जिद्द आणि चिकाटी अंगी बाळगली तर कोणत्याही वयात अशक्य असे काहीच नाही :- मुख्याध्यापक डोमाजी बट्टे…

     रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी…

      आजचा दिवस म्हणजे या छोट्या छोट्या मुलांसोबत छोटे व्हावे आणि स्वच्छंदपणे या शाळेच्या आवारात बागडावे असे वाटू लागले आहे,आणि संत तुकाराम महाराज यांच्या कवितेची ती ओळ सहजच जिभेवर रेंगाळत आहे ,लहानपण देगा देवा,मुंगी साखरेचा रवा ,असे उद्गार जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेचे अध्यक्ष दीपक देशपांडे यांनी मूल तालुक्यातील चितेगाव येथील जि.प. शाळेच्या प्रांगणात आयोजित आनंद मेळावा आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना काढले.

         शालेय जीवनापासून जर आपण योग्य पद्धतीने नियोजन करुन काहितरी वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला तर भविष्यात आपले जीवन निश्चितपणे योग्य पद्धतीने यशस्वीतेकडे मार्गक्रमण करीत राहिल आणि पालकांनी याच वयात आपल्या पाल्यांना योग्य वळण लावले, नियमित शाळेत पाठविले,मुलांचा अभ्यास वेळेवर घेतला तर आणि तेवढ्याच सजगतेने आपले खरेदीचे व्यवहार केलेत तर फसवणुकीच्या प्रकारापासून निश्चितच आपली आणि परिवाराची सुटका करुन घेऊ शकू असा विश्वासही यानिमित्ताने निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

        लता करे नामक एक सत्तर वर्षांच्या आजी आपल्या नवऱ्याच्या इलाजासाठी, पैसे कमावण्यासाठी मॅरेथॉन स्पर्धेत धावण्याच्या शर्यतीत भाग घेऊन एक आदर्श निर्माण करीत स्पर्धा जिंकतात आणि जागतिक किर्तीमान प्रस्थापित करतात तर आजच्या या पिढीने असे आदर्श समोर ठेवून वाटचाल करण्याचा प्रयत्न केला तर ही पिढी निश्चीतच अनेक समस्यांना सामोरे जात यशस्वी होऊ शकतात.

         त्यामुळे जिंकण्यासाठी वयाचे बंधन नसते ही बाब लक्षात घेऊन माता पालकांनी आपल्या मुलांना जिद्द आणि चिकाटी सोबतच आत्मविश्वास जागवायला सुरुवात केली तर आमच्याही शाळेतील मूले कोणत्याही स्पर्धेत, कोणत्याही परिक्षेत मागे पडणार नाहीत की आमचे पालक त्यांना मागे पडू देणार नाहीत अशा शब्दांत विद्यार्थी व पालकांचा आत्मविश्वास आत्मशक्ती जागविण्याचा प्रयत्न केला.

         जि.प.शाळा चितेगाव येथे नुकताच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विद्यार्थी व पालकांच्या विविध स्पर्धांचे व आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

        या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या सौ.सपना दंडेवार तर प्रमुख अतिथी म्हणून, दीपक देशपांडे अध्यक्ष जागृत ग्राहक राजा मूल,गुणाजी वाकुडकर, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती चितेगाव,अल्का उईके,वर्षा कोटावार, वैशाली बागडे, ग्रामपंचायत सदस्य,वाकडे,माजी मुख्याध्यापक, संध्या कुमरे, रमेश डांगरे सचिव, तुळशीराम बांगरे संघटक मुक्तेश्वर खोब्रागडे, दिलीप कटलावार , मुख्याध्यापक डोमाजी बट्टे,मुरले मॅडम आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

           कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन स्वागत गीताने झाली.त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. ग्राहक गीत, वर्ग ७ वीच्या युवती नागोशे व सायली मडावी यांनी सुंदर चाल लावून सादर केले.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक डोमाजी बट्टे, मुख्याध्यापक यांनी केले तर रमेश डांगरे यांनी शाळा, विद्यार्थी आणि ग्राहक यांचे नाते आणि शाळेतील संस्कारांची देणं आयुष्यभर पुरत असते म्हणून आम्ही शाळा महाविद्यालयांत असे ग्राहक जागृती कार्यक्रम आयोजित करीत असतो आजतरी त्यात साखरच अधिक असल्याचा भास होतो आहे.

         कारण इथे मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती आहे त्यामुळे हा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे आणि आमच्या ग्राहक जागृती कार्यक्रमाचे फलीत साध्य होणार आहे ,असा दावा करीत ग्राहक , ग्राहकांची फसवणूक व त्यापासून सोडवणूक करण्यासाठी काय करावे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.

          मुक्तेश्वर खोब्रागडे यांनी आपल्या नौकरी काळातील अनुभव सगळ्यांमुळे ठेवत शेतकऱ्यांची होणारी फसवणूक व ती टाळण्यासाठी करावयाची उपाययोजना सगळ्यांमुळे ठेवली. याप्रसंगी डिम्पल श्रीरामे या इयत्ता पाचवी व रुपेश नागोशे या इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

         याप्रसंगी मुरले मॅडम यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले, विद्यार्थी, माता, पालक यांच्या खेळांचे आयोजन केले.विजेत्यांना उपस्थित पाहुण्यांचे हस्ते बक्षीसे वितरणाचा कार्यक्रम पार पडला..

          त्यानंतर विद्यार्थी व पालकांनी वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचे स्टाॅल लावून आनंद मेळाव्यात सहभाग नोंदविला व विद्यार्थ्यांना आनंद देत त्यात सहभागी झाले.

          या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता ८वीचा विद्यार्थी पूर्वेस पेंदाम याने केले.

          या कार्यक्रमाला चितेगाव येथील विद्यार्थी विद्यार्थीनी,शिक्षक, माता,पालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते,व शाळेचा परिसर फुलून गेला होता, विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.एक आनंददायी कार्यक्रम अनुभवायला मिळाल्याची प्रतिक्रिया उपस्थित प्रेक्षकांमधून उमटत होती.