जागृत ग्राहक राजा,या सामाजिक/ग्राहक संघटनेच्या विदर्भातील पहिल्या शाखेचा मूलमध्ये उद्घाटन सोहळा… — मुख्याधिकारी संदीप दोडे यांचे हस्ते जागृत ग्राहक राजा संघटनेचे उद्घाटन…

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

           सुदृढ आणि सशक्त ग्राहक संघटना निर्माण झाल्याशिवाय जनतेच्या फसवणूक आणि लुबाडणुकीला आळा घालता येणार नाही,असे उद्गार संदीप दोडे मुख्याधिकारी नगर परिषद मूल यांनी जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेच्या मूल शाखेच्या उद्घाटन सोहळा कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलताना काढले.

            जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेच्या विदर्भातील पहिल्या शाखेचा उद्घाटन सोहळा मूल शहरात सोमनाथ मार्गावरील किसान चौकातील मुक्तांगण येथे आज स्वामी विवेकानंद जयंती आणि जिजाऊ माता जयंती दिनाच्या शुभ मुहूर्तावर आयोजित करण्यात आला होता ,या कार्यक्रमाचे आयोजन दीपक देशपांडे व सहकाऱ्यांनी केले होते.

          आपल्या वक्तव्यात मुख्याधिकारी संदीप दोडे, म्हणतात,आज ग्राहक म्हणजे फक्त वस्तूंची देवाणघेवाण करणारे ही संकल्पना वाढिस लागत असली तरी वेगवेगळ्या सेवा यादेखील ग्राहक संरक्षण अधिनियमात समाविष्ट करण्यात आल्या असून बॅंका,व सरकारी कार्यालये देखील या कायद्यात येवू लागले असल्याने तसेच डिजिटल क्रांतीमुळे अनेक व्यवहारात फसवणूक वाढिस लागल्यामुळे ग्राहक संरक्षणासाठी लढणाऱ्या संस्थांची जबाबदारी वाढली आहे, आणि जोपर्यंत ग्राहक संघटित होऊन आपल्या कर्तव्याप्रती जागरुक होत नाही तोपर्यंत फसवणुकीवर आळा घालणे अशक्य असल्याचे स्पष्ट करीत आपल्या या ग्राहक जागृतीच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि आपल्या प्रगतीची व भरभराटीची कामना करतो.

           तसेच जनतेचा सहभाग असल्याशिवाय कोणत्याही कार्याला गती आणि सुयश मिळत नाही त्यामुळे आपल्या या कार्यात जनतेचा सहभाग व आमचेही सहकार्य मिळेल याची खात्री पटवून आपल्या सहकार्याने जनतेच्या दरबारात निश्चित यशाचे दालन उघडता येईल अशी कामना करीत जनतेला सहकार्याचे आवाहन करतो ,असेही स्पष्ट केले.

             हा उद्घाटन सोहळा, दीपप्रज्वलनाने ,व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करुन व पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करीत करण्यात आला. दीपक देशपांडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न या उद्घाटन सोहळ्यात जागृत ग्राहक राजा या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यालयाचे उद्घाटक मूल नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप दोडे यांचे पुष्पगुच्छ देवून सत्कार करीत अभिनंदन व स्वागत केले.

              जागृत ग्राहक राजा या संघटनेचे अध्यक्ष दीपक देशपांडे यांनी कार्यक्रमाचे आयोजनाची पार्श्वभूमी आणि संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याची माहिती सादर केली. जनतेच्या दरबारात जनतेला संपर्कासाठी निश्चित असे स्थान उपलब्ध करून दिल्यानंतर आमची जबाबदारी वाढणार आहे मात्र जनतेसाठी आणि ग्राहक जागृतीच्या आमच्या या यज्ञकुंडात शोषणमुक्त समाज घडविण्यासाठी आम्हा सहकाऱ्यांनी उचललेले हे पहिले पाऊल असल्याचे स्पष्ट केले.

            अशोक मैदमवार, उपाध्यक्ष यांनी आम्हाला नवीन कार्य सुरू केल्यानंतर नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागणार असून आता आम्ही त्या दिशेने टाकलेले हे पाऊल म्हणजे जनतेसाठी नाही तर आमच्या साठी मोठं आव्हान असून तो मैलाचा दगड ठरावा असे मत व्यक्त केले.

           डॉ.आनंदराव कुळे, कार्यकारीणी सदस्य यांनी संघटनेच्या माध्यमातून शोषित पिडीत जनतेच्या उत्थानासाठी आम्ही आता आपल्या कार्याला ग्रामपातळीवर घेऊन जाण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत असून वस्तू व सेवांमधील शोषणाविरुद्ध हळूहळू संवाद समन्वयातून साध्य गाठण्यासाठी प्रयत्न सुरू केला असल्याने आता जनतेने शोषणाविरुद्ध तक्रारी करायला पुढे आले पाहिजे असे मत व्यक्त केले.

              मुक्तेश्वर खोब्रागडे यांनी जनतेने फसवणुकीपासून सावध राहण्याची आवश्यकता लक्षात घेऊन आता आपल्या कर्तव्यात कसूर करु नये असे आवाहन केले.

             तुळशीराम बांगरे यांनी आपण छोट्या छोट्या गोष्टिंपासून आपल्या फसवणुकीचे विरोधात तक्रार करण्याची व ती सामंजस्यानेही कशी सुटू शकते हे बघण्यासाठी तरी जागृत ग्राहक राजा या संघटनेच्या कार्याला समजून घेण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.

             सौ.दर्शना देशपांडे यांनी महिलांनी ग्राहक म्हणून आपले अधिकार समजून घेऊन आपल्या फसवणुकीला आपणच कसे जबाबदार आहोत हे पटवून देत महिलांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची गरज व आवश्यकता किती जास्त आहे याबाबत आपली भुमिका स्पष्ट केली.

              कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना रमेश डांगरे सचिव यांनी एकुणच संघटनेची वाटचाल,आधी कार्याची सुरुवात,जनतेच्या प्रश्नावर तोडगा,काही महत्त्वाच्या निर्णयात सामंजस्याने तोडगा काढता येतो हा विश्वास, ग्राहकाभिमुख निर्णय, अधिकारी वर्गाची साथ आणि निर्णयाची अंमलबजावणी, काही कटू निर्णय घेतांना येणाऱ्या अडचणी व. पदाधिकारी व जनतेच्या सहकार्यातून तोडगा काढण्याची पद्धत यावर प्रकाश टाकला. व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानून अध्यक्षांचे परवानगीने कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.

            हा उद्घाटन सोहळा मर्यादित पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे उपस्थितीत ऐनवेळी पार पाडण्यात आला.