गडचिरोलीच्या ‘आका’ चा बंदोबस्त करा :- माकपचे जिल्हा सचिव काॅ.अमोल मारकवार यांची मागणी… — सुरजागडच्या यात्रेत कंपनी विरोधात नारेबाजी केल्याने भोलू सोमनानी याने दिली जिवे मारण्याची धमकी… — जिल्ह्यात चालू आहे KGF प्रकार…

ऋषी सहारे 

   संपादक

आरमोरी :- सुरजागड येथील ठाकुरदेव यात्रेत खदान कंपनी लाॅयड मेटल्स च्या विरोधात नारेबाजी केल्याच्या रागातून पुर्वाश्रमीचा ‘दारू तस्कर’ भोलू उर्फ बलराम सोमनानी याने हात पाय तोडण्याची व जिवानिशी ठार मारण्याची मला धमकी दिली असून भोलू सोमनानी याचेवर कारवाई करुन त्याचा बंदोबस्त करावा व खदान विरोधी कार्यकर्त्यांच्या जिविताच्या सुरक्षेची उपाययोजना तातडीने करण्यात यावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ.अमोल मारकवार यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे केली आहे.

             काॅ.अमोल मारकवार यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे मेलद्वारे केलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, ५ ते ७ जानेवारी दरम्यान सुरजागड येथील ठाकुरदेवाची यात्रा पार पडली. या यात्रेत स्थानिक आदिवासी जनतेची सहानुभूती मिळविण्याच्या प्रयत्नात लाॅयड मेटल्स कंपनीने गोटूलच्या मागे शौचालय व इतर झगमगाट केल्याने, आमच्या पारंपारिक यात्रेत आणि संस्कृतीमध्ये ढवळाढवळ करण्याचे काम कंपनी करीत असल्याचा रोष इलाख्यातील पारंपारिक प्रमुख व कार्यकर्ते यांनी व्यक्त केला. त्यामुळे ६ जानेवारी रोजी सप्तरंगी ध्वजवंदनेच्या वेळी कंपनीच्या विरोधात नारे देण्यात आले.

            नेमका याचाच राग मनात धरून बुधवार दिनांक ८ जानेवारी रोजी शेकापचे नेते भाई रामदास जराते व ॲड. लालसू नरोटे यांना वाॅट्स अप काॅल करुन भोलू सोमनानी यानी, अमोल मारकवार याने लाॅयड मेटल्स कंपनी आणि कंपनीचे डायरेक्टर प्रभाकरन यांच्या विरोधात मुर्दाबादचे नारे दिले आता तो कसा जिवंत राहतो, त्याचे आता हातपाय तोडल्याशिवाय राहत नाही. अशी धमकी दिली.

            सदर घटनेवरून मला प्रचंड धक्का बसलेला असून ज्या भोलू उर्फ बलराम सोमनानी यांनी भाई रामदास जराते आणि ॲड. लालसू नरोटे यांच्या माध्यमातून मला जिवे मारण्याची व हातपाय तोडण्याची धमकी दिली तो भोलू सोमनानीने यापूर्वी वैरागड येथून संपूर्ण जिल्हाभरात अवैध दारू तस्करीचे रॅकेट चालवायचा. त्या बदल्यात त्याच्या विरोधात आरमोरी सह विविध पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.

          तसेच त्या अवैध तस्करी बाबत त्याचेवर ‘मोक्का’ ॲक्ट लावण्याची कारवाई सुद्धा त्यावेळी प्रस्तावित करण्यात आलेली होती. मात्र दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारूची तस्करी करून करोडो रुपयांची माया जमविली आणि त्या संपत्तीच्या जोरावर आपल्यावरच्या केसेस दडपण्याचे प्रयत्न केलेले आहेत.

           हप्तेबाजीतून त्यावेळी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांशी असलेल्या संबंधातून साधारणतः २०१६ पासून त्याने, लाॅयड मेटल्स कंपनीच्या खदानीला स्थानिकांचा होणारा विरोध मोडून काढण्यासाठी पुढाकार घेतला व कंपनीचा मोरक्या म्हणून तो काम पाहत आहे.

          जिल्ह्यात असलेल्या नक्षलग्रस्त परिस्थितीमुळे स्थानिक ग्रामसभांच्या कार्यकर्त्यांना नक्षल समर्थक ठरवून जेलमध्ये टाकण्याची धमकी देऊन सदरची लोहखदान खोदल्या गेली. यातून दहा-बारा वर्षांपूर्वी काहीच संपत्ती नसलेल्या भोलू उर्फ बलराम सोमनानी याने आपल्या आणि नातेवाईकांच्या नावाने २५० ते ३०० कोटींची संपत्ती जमवल्याची सध्या चर्चा आहे.

           त्यातून त्याचे अनेक राजकीय पक्षांचे नेते, आमदार, मंत्री, प्रशासनातले वरीष्ठ अधिकारी यांच्याशी जवळचे संबंध प्रस्थापित झाले आहेत. त्याच जोरावर या दारू तस्कर, गुंड प्रवृत्तीच्या भोलू सोमनानीची हिम्मत वाढलेली असून लोहखानीतून वाहतुक करणाऱ्या ट्रकांच्या अपघातात मृत्यू पावलेल्या शेकडो परिवारांना धमकावून, जबरीने पैसे देऊन चुपचाप बसविले व अधिकाऱ्यांना हप्ते देऊन अपघातांचे पुरावे नष्ट केले किंवा केसेस दडपून टाकल्या आहेत. भोलू सोमनानीला कंपनीचा आर्थिक पाठबळ आणि त्यातून प्रशासनाचा अभय मिळत गेल्याने आता खदान विरोधी कार्यकर्त्यांना युएपीए सारख्या प्रकरणात अधिकाऱ्यांना हाताशी धरून गुंतविण्याचा नाहीतर जिवंत मारण्याच्या धमक्या देण्यापर्यंत मजल गेलेली आहे, असा आरोपही काॅ. अमोल मारकवार यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

           राज्यात सध्या गाजत असलेले बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख आणि लगतच्या छत्तीसगड राज्यातील लोकप्रिय पत्रकार मुकेश चंद्रकार यांची झालेली हत्या बघता लाॅयड मेटल्स कंपनीच्या वतीने भोलू उर्फ बलराम सोमनानी याने मला मारून टाकण्याची, हातपाय तोडण्याची दिलेल्या धमकीच्या घटनेकडे दुर्लक्ष करण्यासारखे नसून मला आणि भाई रामदास जराते, सैनु गोटा, ॲड. लालसू नरोटे अशा प्रमुख खदान विरोधी कार्यकर्त्यांना जिवंत मारणे, हातपाय तोडणे, नक्षल समर्थनाच्या खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून जेलमध्ये टाकणे या संबंधाने सुरक्षा मिळणे अत्यावश्यक आहे.

           करिता आपले स्तरावरून सदर प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी होऊन स्थानिकांच्या विरोधानंतरही पेसा, जैविक विविधता, वन हक्क कायद्यांचे उल्लंघन करून बळजबरीने विकासाच्या नावावर शासन – प्रशासन व भोलू सोमनानी व इतर गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून लोह खदान खोदली जात असताना, मला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भोलू सोमनानीचा बोलवता धनी कोण आहे? याचा पडदाफाश करण्यात यावा व माझ्या आणि इतर खदान विरोधी कार्यकर्त्यांच्या जीविताच्या सुरक्षेची उपाययोजना तातडीने करण्यात यावी, अशी मागणीही काॅ. अमोल मारकवार यांनी केली आहे.

           सदर तक्रारीच्या प्रती राज्याचे गृहमंत्री, नागपूर विभागाचे पोलिस आयुक्त, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.