विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी ‘त्या’ शेतकऱ्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी… — तालुक्यातील मदनापूर येथील घटना…

     रामदास ठूसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी

     चिमूर –

              शाळेलगतच्या शेतशिवारात शौचास गेलेल्या विष्णू विनोद कामडी (१२) या विद्यार्थ्याचा जीवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने मृत्यू झाल्याची घटना २ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी चिमूर पोलिसांनी शेतात विद्युत प्रवाह सोडणारा शेतकरी तथा मदनापूर भाजपा बुथ अध्यक्ष गोवर्धन रंधये याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला आठ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

             २ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. विष्णू हा गावातील मुलांसह रोजच्या प्रमाणे पहाटेच्या सुमारास व्यायामासाठी गेला होता. जय लहरी, जय मानव विद्यालयाच्या खुल्या पंटागणात व्यायाम करीत असताना त्याला शौचास लागल्याने तो पटांगणालगत असलेल्या गोवर्धन रंधये यांच्या शेतातील बोडीवर गेला. मात्र, परत येताना रंधये यांनी लावून ठेवलेल्या जीवंत विद्युत तारांना त्याचा स्पर्श झाल्याने तो जागीच गतप्राण झाला.

           या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी गोवर्धन रंधये याला अटक करून चिमूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला आठ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव, चिमूरचे ठाणेदार मनोज गभणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद जांभळे करीत आहेत.