धम्मचक्र प्रवर्तन दिन : एक ऐतिहासिक क्रांती सोहळा…

धम्मचक्र प्रवर्तन दिन : एक ऐतिहासिक क्रांती सोहळा…

विजयदशमी म्हणजे अशोका विजयादशमी होय. या दिनाला बौद्ध धर्मात एक महत्त्वपूर्ण इतिहास लाभलेला आहे. महान बौध्द सम्राट अशोकाच्या विजयाचा हा दिन होय. सम्राट अशोकांनी जागतिक धम्मचक्र प्रवर्तनाचे एक महान काम केले आहे. पुढे हेच सम्राट अशोकाचे धम्मचक्र गतिमान करण्याचे बहुमोल कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवून आणले आहे. दलित आणि अस्पृश्य समाजाच्या डोक्यावर गेली हजार वर्षे जे काळेकुट्ट ढग जमले होते, ते या अडीच हजाराव्या बौध्द वर्षाच्या विजया दशमीला धम्मचक्र नवप्रवर्तन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नष्ट केले आणि आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. हाच तो महामंगल दिन ‘विजयादशमी’ म्हणजेच

             १४ आक्टोबर १९५६ होय. याच दिवशी हिंदू धर्माच्या सीमामध्ये बंदिस्त अस्पृश्य समाज या दिवशी शतकानुशतके गुलाम ठेवणारी धार्मिक तटबंदी उल्लंघून नवस्वातंत्र्याचे उदक पिऊन तृप्त झाले. डॉ बाबासाहेबआबेडकर यांनी १९३५ साली घेतलेली प्रतिज्ञा “मी हिंदू म्हणून जन्माला आलो असेन, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही” ही पूर्ण झाली. हा जगाच्या इतिहासातील धार्मिक क्रांतीचा हा महत्त्वपूर्ण क्षण होता.

      आज या मंगल दिनाचा वृतांत आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो.

 दि.१४ आक्टोबर १९५६ विजयादशमीच्या बौद्ध दीक्षा विधीचा मंगल दिन. याच महान समारंभासाठी नागपूर शहराच्या दक्षिणेस जवळजवळ शहराच्या बाहेर अंबाझरी नावाचा रोड आहे. या रोडला लागून असलेले सुमारे १४ एकर क्षेत्राचे विस्तीर्ण मैदान बौद्ध दीक्षा विधी साठी मक्रुर करण्यात आले होते. हे पटांगण सभोवार तट्टया मारून तयार केले होते. एकूण तीन मंडप होते. मधील मंडप सुमारे ‘४०×२०’ आकाराचा होता. त्यावर बौध्द कालीन स्मृती दर्शविणारा स्तूप उभारण्यात आला होता. दोन्ही बाजूंच्या मंडपापैकी एक स्त्रियांच्या करीता व दुसरा, प्रमुख नागरिकांसाठी होता. मध्यवर्ती मंडपासमोर वृत्तपत्राच्या वार्ताहरांकरीता खास बसण्याची सोय केली होती. स्वदेशी आणि परदेशी मिळून जवळजवळ ३० वार्ताहर आहेत फोटोग्राफर हजर होते. तर मैदानात सभोवताली सुमारे २००० ते ३००० विद्युत दिपांची व्यवस्था केली होती. लाल हाफ शर्टस् घातलेल्या नागपुराच्या समता सैनिक दलाने मैदानापासून अलीकडे चार फर्लांग एवढ्यावर अंबाझरी रोडचा बंदोबस्त ठेवला होता.

       दि ११ आक्टोबर १९५६ या दिवसांपासून दीक्षा घेवू इच्छिणाऱ्यांची नोंदणी सुरु झाली होती. दीक्षा घेणाऱ्या अनुयायांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून यावे,असे सांगण्यात आले होते.

         जगाच्या कानाकोपऱ्यातून या महान कार्यासाठी जनसमुदाय दीक्षा भूमीकडे येत होता. प्रवासात गाडीमधून ही दीक्षार्थी मंडळी “बाबासाहेब करे पुकार, बौध्द धर्म का करो स्वीकार”,भगवान बुद्ध की जय”,आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय”या सामुदायिक घोषणांनी ठिकठिकाणची रेल्वे स्टेशन दुमदुमून गेली होती. नागपूर रेल्वे स्टेशनवर दि.१३आणि १४ आक्टोबर रोजी येणाऱ्या गाड्या सर्व बौद्ध दीक्षा घेवू इच्छिनारांनीच भरगच्च भरून येत होत्या. लोक पथकापथकाने समारंभाच्या जागेकडे ‘बुद्धं शरणं गच्छामि’ धम्म शरणं गच्छामि, संघ शरणं गच्छामि’ हा जयघोष करीत जात होते.

          एकेकाळी बौद्ध महापंडित नागार्जुन यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे नागपूर शहर आज तमाम अस्पृश्य समाजाचे धर्म क्षेत्र बनले होते.

         बौद्ध दीक्षा समारंभासाठी खास ब्रम्ह देशाचे ऐंशी वर्षाचे महास्थवीर पूज्य भिक्षु चंद्रमणी यांना पाचारण केले होते.

       सर्व त्यांच्या कडून प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली जाणार होती.

         या महासोहळ्यासाठी जवळजवळ ५ ते ६ लक्ष अनुयायी दीक्षा घेण्यासाठी जमलेले होते.त्यापैकी ३ ते ४ लक्ष लोक बाहेर गावाहून आले होते. समारंभाच्या ठिकाणी यात्रेचे स्वरूप आले होते.

          धम्मपीठावर अग्रभागी एका मेजावर बुद्धांचा ब्रांझचा पुतळा ठेवलेला होता. त्याच्या दोन्ही बाजूला एकेक सिंह व समोर उद प्रज्वलीत होत होता.

          समारंभाला कु. इंदूताई वराळे यांनी स्वागत पद गावून सुरुवात केली. तद्नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पिताश्री स्मृतिशेष रामजी मालोजी आंबेडकर यांची पुण्यतीथी दि.१४/१०/१९५६रोजी असल्याने त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी पाच लक्ष लोकांनी उभे राहून काही मिनिटे स्तब्धता पाळली. नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माईसाहेब आंबेडकर यांनी पूज्य भिक्षु चंद्रमणी यांच्या समोर उभे राहून, भगवान बुद्धांच्या मूर्ती समोर आपले हात एकत्रित जोडून भंते च्या मागोमाग पाली भाषेत तीन वेळा त्रिसरण,पंचशील ग्रहण करुन बौद्ध धर्म स्वीकारला. या बौद्ध धम्म दीक्षेनंतरभगवान बुद्धांच्या प्रतिमेस स्वच्छ कमलांचा पुष्पहार अर्पण केल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवान बुद्धांच्या चरणी मस्तक ठेवून त्रिवार वंदन केले. 

तद्नंतर आपल्या अनुयायांना ते म्हणाले,

         “भगिनींनो, आणि बंधुजनहो, आम्ही दोघांनी तुमच्या समोर भिख्खू चंद्रमणी यांच्या हस्ते बौद्ध धर्माचा अनुग्रह केला आहे. चंद्रमणी भारतातील वयस्क भिख्खू आहेत. आता आमचा जो बौद्ध धर्म अनुग्रह झाला तो पाली भाषेत झाला. त्या अनुग्रहाचे मराठी भाषांतर करुन पुनः अनुग्रह घेत आहे.

         यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गंभीर वाणीने तो धम्मार्थ मराठीतून लाऊडस्पीकर वरुन तो उपस्थितांना ऐकविला.

          ते पुढे म्हणाले, आता मी तुम्हा सर्वांना बुद्ध धर्माची दीक्षा देणार आहे. ज्यांना हिंदू धर्माचा त्याग करुन बुद्ध धर्म स्वीकारायचा आहे, त्यांनी कृपा करुन उभे राहावे आणि माझ्या मागून शब्दांचे उच्चारण करावे. असे म्हणताच सर्व पाच ते सहा लक्ष जनसमुदाय उभा राहिला. आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली. दीक्षा विधीचा एक भाग म्हणून दीक्षार्थी कडून २२ प्रतिज्ञा वदवून घेतल्या.

         हा सोहळा सुमारे ५०मिनिटे सुरु होता. या वेळी अखिल भारतीय महाबोधी समितीचे सरचिटणीस श्री. वलीसिन्हा यांनी बाबासाहेबांना एक चिकण मातीची बुद्ध प्रतिमा भेट म्हणून दिली.

         रात्री औरंगजेबादच्या मिलिंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी “युगयात्रा”या नाटकाचा प्रयोग सादर केला. या नाटकास सौ.माईसाहेब हजर होत्या.

         सोमवार दि.१५ आक्टोबर १९५६ रोजी सकाळी १० ते १२ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बौध्द धर्म स्वीकार यासंबंधी उद्बोधक, स्फूर्तीदायक आणि अत्यंत तळमळीचे माहिती पूर्ण भाषण झाले.

         ते म्हणाले, काल आणि आज सकाळी जो बौध्द दीक्षा घेण्याचा व देण्याचा विधी घडून आला त्याचे स्थान, विचारवंत लोकांना कदाचित अवघड वाटत असेल. पुष्कळसे लोक मला प्रश्न विचारतात की या कार्यासाठी तुम्ही नागपूर हे शहर का निवडले? अन्य ठिकाणी हे कार्य का केले नाही.? काही लोक म्हणतात की आर.एस.एस. ची राष्ट्रीय सेवा संघाची मोठी पलटन येथे असल्यामुळे त्यांच्या उरावरती म्हणून आम्ही ही सभा या शहरात घेतली आहे. हे मुळ खरे नाही. त्यासाठी नागपूर येथे हे कार्य घेतलेले नाही. आमचे कार्य इतके मोठे आहे की आयुष्यातील एक एक मिनिट देखील कमी पडतो. आपले नाक खाजवून दुसऱ्याला अपशकुन करण्यासाठी मजजवळ वेळ नाही.

          हे ठिकाण निवडण्याचे कारण निराळे आहे. ज्यांनी बौद्ध इतिहासाचे वाचन केले असेल त्यांना हे कळून येईल की भारतात बौद्ध प्रसार जर कोणी केला असेल तर तो नाग लोकांनी केला. नाग लोक आर्यांचे भयंकर शत्रू होते. आर्य आणि अनार्य यांच्या मध्ये तुंबळ युद्धे झाली. आर्य लोकांनी नागांना जाळून टाकल्याचे दाखले पुराणात सापडतात. अगस्त ऋषींनी त्यातून एक नाग वाचविला. त्यांचेच आपण वंशज आहोत. ज्या नाग लोकांना एवढा छळ सोसावा लागला त्यांना वर येण्यास कोणीतरी महापुरुष हवा होता;त्यांना तो महापुरुष भगवान बुद्ध भेटला. भगवान बुद्धांचा उपदेश नाग लोकांनी सर्व भारतात पसरविला. असे आपण नाग लोक आहोत. नाग लोकांची मुख्य वस्ती नागपूर येथे आणि आसपास होती असे दिसते.

          म्हणून या शहरास ‘नाग-पूर’ म्हणजे नागांचे गाव असे म्हणतात. हे स्थळ निवडण्याचे मुख्य कारण आहे.

        आपण बौद्ध धर्म स्वीकारताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. बौद्ध धर्माची तत्त्वे कालिक, काही कालापुरती आहेत असे कोणासही म्हणता येणार नाही. बुद्धांची तत्वे अजरामर आहेत. तथापि बुद्धांनी असा दावा केला नाही की हा धर्म ईश्वराचा आहे. हा धर्म वाटेल तर तुम्ही घ्यावा, आणि तो तुमच्या बुद्धीला पटेल, तेव्हा तुम्ही स्वीकारा. एवढी उदारता इतर कोणत्याही धर्मात पहायला मिळत नाही. ईतर सर्व धर्मांनी ईश्वराचे अस्तित्व मान्य केले, पण देव अथवा आत्मा यांना बौध्द धर्मात जागा नाही. बुद्ध सांगतात,जगात सर्वत्र दुःख आहे; ९०% लोक दुःखाने पिडीत आहेत. त्यांना दुःखातून मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य आहे. 

           भगवान बुद्ध या देशात नांदत होते.त्यांचा तो धर्म आजही या देशाचा धर्म होईल, यात मला शंका वाटत नाही.मनुष्यत्व, समदृष्टी, बंधूभाव, आणि प्रेम यांनी खरा धर्म झालेला आहे. माझ्या अभ्यासाअंती मानवास बुद्धाशिवाय दुसरा धर्म नाही. जगात जर कोणता धर्म राहावयाचा असेल तर तो बुद्ध धर्मच होय.

         आज दोन हजार पाचशे वर्षानंतरही बुद्धांची सारी तत्त्वे सर्व जग मानते.

       डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांना दिलेला मोलाचा संदेश..

           आज तुमच्या समोर बौद्ध धर्माची जबाबदारी मोठी आहे. तुमच्या बद्दल इतर लोकांना आदर वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे. हा धर्म म्हणजे आपण एक गळ्यात मडके अडकून घेत आहोत असे मानू नका. बौध्द धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी सध्या शून्यवत आहे. म्हणून आपण उत्तम रितीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्या देशाचा, इतकेच नव्हे तर जगाचाही उद्धार करु शकेल. कारण बौद्ध धर्मानेच जगाचा उध्दार होणार आहे.

          हा मार्ग जबाबदारीचा आहे. आपण काही संकल्प केला आहे, काही इच्छिलेले आहे, हे लक्षात तरुणांनी घ्यावे. त्यांनीकेवळ पोटाचा पाईक बनू नये. आपल्या प्राप्तीचा निदान २० वा हिस्सा या कामी देईन, असा निश्चय करावा.

        मला सर्वांना बरोबर न्यावयाचे आहे. प्रथम तथागतांनी काही व्यक्तींना दीक्षा दिली व त्यांना” या धर्माचा प्रचार करा”असा आदेश दिला. त्या प्रमाणे पुढे यश व त्याच्या ४० मित्रांनी बौध्द दीक्षा घेतली. यश हा श्रीमंत घराण्यातील होता. त्यांना भगवंताने सांगितले, हा धर्म कसा आहे? तर ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय, लोकानुकंपाय, धम्म आदि कल्याणं, मध्ये कल्याणं, पर्यावसान कल्याणं’ त्यावेळच्या परिस्थिती प्रमाणे तथागतांनी आपल्या धर्माच्या प्रचाराचा मार्ग तयार केला.

          आतां आपणालाही यंत्रणा तयार करावी लागेल, म्हणून समारंभानंतर दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी. दरेक बौध्द माणसाला दीक्षा देण्याचा अधिकार आहे, असे मी जाहीर करतो.”

          याचाच परिणाम आज दरवर्षी लाखो अनुयायी बुद्धांच्या छत्रछायेखाली येवून वाचून, समजून,आणि अनुभवून दीक्षा घेत आहेत.खात्रीने हा यशस्वी धम्मरथ गतिमान होताना दिसत आहे. 

         हा संदेश घेऊन आम्ही अनुयायांनी जागृत झाले पाहिजे. आणि आंबेडकरी चळवळ धम्म रथ गतिमान केला पाहिजे.

          बाबुराव पाईकराव

                    डोंगरकडा

                             ९६६५७११५१४