दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे ; पुणे सिव्हिल कोर्ट (शिवाजीनगर) ते तीर्थक्षेत्र आळंदी या ठिकाणी मेट्रो ट्रेनची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अजय सावंत व माजी नगरसेविका शितल सावंत यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सावंत यांनी पवार यांच्याबरोबर पुणे शहराच्या पूर्व भागातील विविध प्रश्नांवरही निवेदन देत चर्चा केली.
यावेळी सावंत यांनी सांगितले की महाराष्ट्रातून दररोज हजारो भाविक संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवनी समाधीचे दर्शन घेण्याकरिता येत असतात. तसेच हा पालखी मार्ग असल्याने आषाढी वारी निमित्त वारीच्या दोन ते तीन महीने आधी पासून लाखो भाविक याठिकाणी वारी करीता दाखल होतात. तसेच चाकण एमआयडीसी मध्ये शहरातील पूर्व भागातील हजारो कष्टकरी वर्ग रोज प्रवास करतात. आळंदी व आजूबाजूच्या परिसरात मागील काहीवर्षांपासून मोठ्या प्रमाणात लोक वसाहत वाढल्याने तेथील विद्यार्थ्यांना पुण्यात शिक्षणासाठी यावे लागते. या सर्व बाबींचा विचार करता पुणे सिव्हिल कोर्ट ते तीर्थक्षेत्र आळंदी या मार्गावर मेट्रो ट्रेनची सुविधा उपलब्ध करून स्थानिक कामगार वर्ग, भाविक व विद्यार्थी यांच्या प्रवास सुखकर होण्यास मदत होईल व या मार्गात विविध ठिकाणी होणारी वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल असे माजी नगरसेविका शीतल सावंत यांनी सांगितले.
तसेच पुणे शहराच्या पूर्वेकडील भागात नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा, मुला-मुलींन करीता अत्याधुनिक क्रीडांगण, मनपा शाळांचे आधुनिकीकरण, शासकीय सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटल अशा विविध विषयांवर उपाय योजना करण्यात याव्या अशी मागणी अजय सावंत व मा. नगरसेविका शितलताई सावंत यांनी केली. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी यासर्व बाबींचा निश्चितपणे गांभीर्यपूर्वक विचार करू व या सुविधा कशा पुरविता येतील याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने लक्ष देवू असे आश्वासित केले.