सतिश कडार्ला,
जिल्हा गडचिरोली
गडचिरोली,(जिमाका)दि.11: महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडुन शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्याच्या उद्देशाने कृषी उत्पन्न बाजार समित्या मार्फत ” शेतमाल तारण कर्ज योजना “सन 1990-1991 पासुन सुरु करण्यात आली आहे. शेतमालाला कमी भाव असतानाच्या काळात शेतमालाला गोदाम तसेच कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या योजनेत विशेषत: सुगीच्या काळात बाजारपेठेत एकाच वेळसे एकाच प्रकारचा मोठया प्रमाणात शेतमाल शेतकरी विक्रीस आणतात तेव्हा शेतमालाचे भाव पडतात (कमी) होतात. अशा वेळी शेतकऱ्याच्या मालाला तारण देणारी महत्वकांक्षी अशी योजना असून या योजनेतून तुर, मूग, उडीद, सोयाबीन, सूर्यफूल, चना, भात(धान), करडई, ज्वारी, बाजारी, मका, गहू, वाघ्या घेवडा(राजमा), बेदाणा, हळद, काजू बी व सुपारी आदीना लाभ दिला जातो. शेतकरी कमी भावाच्या काळातही उत्पादने बाजार समितीकडे तारण ठेवू शकतात. यासाठी बाजार समितीकडून मोफत गोदाम उपलब्ध् करुन दिले जाते. तसेच वार्षिक फक्त 6 % इतक्या कमी व्याज दरात शेतकऱ्यास शेत मालाच्या त्यावेळी असलेल्या बाजार भाव किंवा शासनाने जाहिर केलेली आधारभुत किंमत यापैकी जी कमी असेल त्यानुसार 75% रक्कमे इतके कर्ज लगेच उपलब्ध करुन दिले जाते. त्यानंतर वाढीव भावाच्या काळात शेतकरी आपल्या माल विकू शकतो व कर्जाची परतफेड करुन वाढीव रक्कम शेतकऱ्यांना परत मिळते. तसेच वखार पावतीवर सुध्दा तारण कर्ज दिल्या जाते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोफत गोदाम, गरजेच्या वेळी कर्ज, स्टोरेज कालावधीमध्ये शेतमालाचा दर्जा राखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जाते. तसेच गोदामात साठवलेल्या मालाच्या सुरक्षेतेच्या दृष्टीकोनातुन विमा काढल्या जाते. अशा सुविधांमुळे शेतमालास चांगला भाव मिळण्यास मदत होत आहे. शेतमाल तारण कर्ज योजना प्रभाविपणे राबविता यावी यासाठी बाजार समितीकडे चांगल्या क्षमतेचे गोदामे उपलब्ध असणे गरजेचे आहे. यासाठी बाजार समित्यांमध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने राष्ट्रीय कृषी योजनेतून वैज्ञानिक साठवण सुविधांच्या दृष्टीकोनातून वैज्ञानिक पध्दतीने गोदामे उभारलेले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या तारण ठेवलेल्या मालाच्या बदल्यात त्यांना दयावयाच्या कर्जासाठीचा निधीही पणन मंडळामार्फत बाजार समित्यांना वार्षिक फक्त 3% इतक्या कमी व्याजदरात उपलब्ध करुन देण्यात येतो. सन 2022-23 या हंगामातील शेतमाल तारण कर्ज योजनेस 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरुवात होत आहे. ही योजना बाजार समिती व शेतकरी दोघाच्याही फायदयाची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल कमी भावात विक्री न करता पणन मंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहान महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्यावतीने प्रशांत धोटे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, गडचिरोली यांच्याकडून करण्यात येत आहे.