विवेक रामटेके
बल्लारपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी
कोठारी – धाबा वनपरिक्षेत्राच्या कार्यकक्षेत येत असलेल्या वनाला संरक्षित क्षेत्र म्हणून शासन स्तरावर कन्हाळगाव अभयारण्याची घोषणा करण्यात आली आहे. या संरक्षित क्षेत्रात बहूसंख्येने वन्यप्राण्यांचा संचार असुन त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना वनविभागाने सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलत रेस्क्यु संस्थेच्या माध्यमातून गावागावांतील होतकरू मुलांना प्रशिक्षीत करण्यास सुरुवात केली आहे.त्या अनुषंगाने कोठारीत फुले -आंबेडकर सभागृहात कोठारी धाबा वनक्षेत्राच्या संयुक्त विद्यमाने रेस्क्यू प्रशिक्षण शिबिराचे आयोजन शुक्रवारला करण्यात आले होते.
मध्य चांदा प्रादेशिक कोठारी वनपरिक्षेत्राच्या वतीने डॉ.शामाप्रसाद मुखर्जी योजने अंतर्गत स्थानिक फुले, आंबेडकर सभागृहात कोठारी व धाबा वनपरिक्षेत्राच्या सेवाभावी सेवकांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे अध्यक्ष स्थानी कोठारी वनपरिक्षेत्राच्या क्षेत्राधिकारी अर्चना मुरकुटे तर प्रमुख पाहुणे म्हणून धाबा वनपरिक्षेत्राचे क्षेत्राधिकारी एस. जे. बोबडे, रेस्क्यु संस्था पुणे चे मार्गदर्शक नचिकेत उतपात, गोंडपिपरी क्षेत्रसहाय्यक राजेंद्र लडके, कोठारी क्षेत्रसहाय्यक आर. एच. पेदापलीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या शिबिरास उपस्थित मान्यवरांनी वनक्षेत्रात वाढलेली वन्यप्राण्यांची संख्या, वाढत चाललेला मानव वन्यजीव संघर्ष, होणाऱ्या वन्यप्राण्यांच्या शिकारी, वन व वन्यप्राणी संरक्षण या विषयावर मार्गदर्शन केले. रेस्क्यु संस्थेच्या मार्गदर्शकांनी प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. यावेळी कोठारी क्षेत्रातील ४५ व धाबा क्षेत्रातील १४५ असे एकूण १९० प्रशिक्षणार्थी शिबिरात सहभागी झाले होते. शिबिराचे सुत्रसंचलन हरणपायली वनरक्षक उमेश धानोरकर यांनी केले तर दोन्ही क्षेत्राच्या वनरक्षकांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले.