जिल्ह्यातिल २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय तत्काळ मागे घेण्यात यावा… — काँग्रेस नेत्या डाॅ.शिलु चिमुरकरांची शालेय शिक्षण मंत्र्यांकडे मागणी…

           पंकज चहांदे

देसाईगंज/वडसा तालुका प्रतिनिधी 

              दखल न्यूज भारत

देसाईगंज :- गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेला असुन अतिदुर्गम,अतिसंवेदनशील व आदिवासीबहुल नक्षलग्रस्त आहे.जिल्ह्यातील बहुतांशी नागरिक डोंगर दऱ्याखोऱ्यांत वास्तव्यास असुन शिक्षणाच्या तोकड्या व्यवस्थेमुळे अतिशय नाजूक परिस्थितीत मुलांना शिक्षण देत आहेत.

              त्यामुळे २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शासकीय शाळा बंद करण्यात येऊ नयेत, अन्यथा विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस नेत्या डाॅ.शिलु चिमुरकर यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना.दिपक केसरकर यांना उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत पाठवलेल्या निवेदनातुन दिला आहे.

             दिलेल्या निवेदनात चिमुरकर यांनी नमुद केले आहे की शासकीय शाळा ह्या जिल्ह्यातिल विद्यार्थ्यांसाठी एकमेव पर्याय ठरत असतांना २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शासकीय शाळा बंद करून समुह शाळांची निर्मिती करण्याचा घाट घातल्या जात आहे जे की अन्यायकारक आहे.

           यामुळे भविष्यात शासकीय शाळांचे खाजगीकरण करून खाजगी संस्थाचालक अवाजवी शैक्षणिक शुल्क आकारून जिल्ह्यातिल गोरगरीब जनतेच्या पाल्यांना शिक्षणापासुन वंचित ठेवण्याची भिती निर्माण झाली आहे.ही गंभीर बाब लक्षात घेता घेण्यात आलेला निर्णय तत्काळ मागे घेऊन जिल्ह्यातिल विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे करीता यथाशिघ्र उपाययोजना करण्यात याव्यात.

           असे न करता जिल्ह्यातिल शासकीय शाळा बंद करण्यात आल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

             निवेदन उपविभागीय अधिकारी यांचे प्रतिनिधी यांनी स्विकारले आहे.निवेदन देतांना काँग्रेस नेत्या डाॅ.शिलु चिमुरकर,युवा नेते पिंकू बावणे,लीलाधर भर्रे,ओबीसी तालुकाध्यक्ष कैलास वानखेडे, युवक काँग्रेस शहर उपाध्यक्ष विजय पिल्लेवान,महिला तालुका अध्यक्ष पुष्पाताई कोहपरे,वैष्णवी आकरे शहनाज पठाण आदी काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.