“ज्याप्रमाणे आपल्या घरात रांगतं बाळ असतं.त्याला सांभाळणारे आजी,आजोबा, बहीण,भाऊ,काका,काकू, मावशी,आई,वडील इत्यादी वडीलधारी मंडळी घरात असतात.ते बाळ जर विस्तावाकडे जात असेल तर, त्याला ओढणारे,खड्यात पडणारे असेल तर,लगेच उचलून घेणारे, रडत असेल तर लगेच शांत करणारे.थोडक्यात त्या निरागस बाळाला सर्वतोपरी सांभाळण्याची जबाबदारी ही वरील सर्वच वडीलधाऱ्यांची असते.
अगदी याप्रमाणेच लोकशाहीत……….
“सर्वसामान्य जनता,ही या निरागस बाळासारखी असते.
लोकशाहितील या बाळाला सांभाळण्याचे जबाबदार आणि संविधानिक कर्तव्य,हे बाळाच्या (जनतेच्या) फायद्याचे कायदे निर्माण करणाऱ्या कायदेमंडळाचे म्हणजेच आमदार आणि खासदार यांचे असते.
यांनी निर्माण केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे घटनात्मक व नैतिक कर्तव्य हे कार्यकारी मंडळाचे म्हणजेच केंद्रसरकार आणि राज्यसरकारचे असते.
या बाळाच्या ( जनतेच्या ) फायद्याचे केलेल्या कायद्याची अंमलबजावणी ही संविधानिक पद्धतीने व्यवस्थितपणे होते किंवा नाही,हे पाहण्याचे,प्रसंगी कठोर भूमिका घेऊन संविधानिक कर्तव्य बजावण्याचे काम हे न्यायालयाचे असते.
वरील तिन्ही बाळाचे संरक्षक,जर वरील प्रकारचे नैतिक कर्तव्यांना तिलांजली देऊन स्वैराचाराने ( कुटनीतीने ) या निरागस बाळाचे अनौरस पुत्रासारखे संधीसाधू संगोपन होत असेल,तर जो पत्रकारिता हा चौथा व अदृश्य स्तंभ आहे.त्याचे नैतिक व घटनात्मक कर्तव्य हे आहे की,वरील तिन्ही संरक्षकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणे.शिवाय बाळासमोर त्यांना उघडे पाडण्याची जबाबदारी या चौथ्या कॉलमची असते.त्यासाठी सर्वांचा विरोध पत्करण्याची जबाबदारी सुद्धा प्रसंगी घ्यावी लागते.
अशी लोकशाही वृद्धिंगत होण्यासाठी कुटुंबातील सर्वच वडीलधारी मंडळीत जबाबदारी व कर्तव्यातून नैतिकता आणण्यासाठी संविधानाची आवश्यकता असते.जर यांच्यात ती नैतिकता नसेल,तर हळूहळू मोठ्या होणाऱ्या या निरागस बाळाला,जेंव्हा त्याला समज यायला लागते,तेंव्हा तेच बाळ याच संविधानातून जबाबदारीने समज येऊन प्रसंगी याच वडीलधाऱ्या मंडळीना धडा शिकविण्याची सुद्धा जबाबदारी पार पाडावी लागते.
त्यामुळे लोकशाहीचे वय किती आहे,यापेक्षा यातील निरागस बाळ हे किती समजदार झाले? आणि त्यात वडीलधाऱ्या मंडळीचा किती वाटा आहे? यातच लोकशाहीची परिपक्वता अवलंबून आहे.म्हणून म्हणतात ना,की माणूस किती जगला? हे महत्वाचे नसून कसा जगला? हे महत्वाचे आहे.!
जागृतीचा लेखक
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,औरंगाबाद,रेणापूरकर, 7875452689..