उमेश कांबळे ता प्र भद्रावती :
तालुक्यातील सागरा येथे दिवसाढवळ्या अवैधरीत्या मद्यविक्री व जुगार सुरु आहे, परिणामी त्या परिसरातील ग्रामीण जनता यापासून त्रस्त झाली आहे. याबाबत वारंवार पोलीस प्रशासनाला सांगून देखील कोणतीच कार्यवाही होत नाही, त्यामुळे सागरा येथील गावकऱ्यांनी उपसरपंच शंकर रासेकर यांच्या नेतृत्वात
आज (दि.११) पासुन आमरण उपोषण सुरु केले आहे.
अवैध दारुविक्री मुळे व जुगारामुळे गावकरी व्यसनाला बळी पडून गावातील सामाजिक सास्थ्य बिघडत चालले आहे. गावातील अनेक कुटुंबातील महीलांवर फार मोठ्या प्रमाणात कौटुंबिक हिंसाचार सुरू झाले आहेत. लहान मुले देखील दारूच्या आहारी गेले आहेत. कोणत्याही क्षणी सागरा या गावामधे घातपात होवून शांतता भंग होवू शकते. त्यामुळे अवैध दारु विक्री व जुगार व्यवसाय बंद करा व या व्यावसायीकांवर कारवाई करा, अशी मागणी या आंदोलनकर्त्यांची आहे.
शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत बीट जमादार यांना वारंवार लेखी व तोंडी माहिती देवूनही अवैधरीत्या मद्य विक्री करणाऱ्यांवर व जुगार खेळणा-यांवर कोणतीही कारवाई पोलीस विभागातर्फे झालेली नाही.
याबाबत याअगोदर राज्य उत्पादन शुल्क अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आदींना निवेदन देण्यात आले होते, मात्र निवेदनाची प्रशासनाने दखल घेतली नाही.
या आमरण उपोषण आंदोलनात सागरा येथील उपसरपंच शंकर रासेकर, युवराज निबुदे, दिनेश आसुटकर, ईश्वर वाग्दरकर, गणपत घाटे, गुलाब बांदुरकर, बंडु बांदुरकर, नत्थु झाडे, भारत जुनारकर, वसंता अडकिने, उध्दव बोबडे, संगीता सरोदे, जया खाडे, त्रिवणा बांदुरकर, कलावती अडकिने, मंदा वाग्दरकर, माधुरी आवडे, सखुबाई रासेकर, वैशाली जुनारकर, कमला बोबडे, आदी गावकरी उपस्थित होते.