सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्या मार्गदर्शनात भाजपा पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून साजरा केला आनंद..

 

दखल न्यूज भारत

विजय शेडमाके

 

        महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारला नेहमीच घटनाबाह्य सरकार म्हणून आरोप करीत सरकारवर सातत्याने टीका केली.मात्र आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने शिंदे फडणवीस सरकार घटनाबाह्य नसल्याचा निर्णय देऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांना जबरदस्त चपराक दिली असल्याची प्रतिक्रिया गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी या माध्यमातून दिली आहे.

      आपल्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने १६ आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असे निर्देश दिल्याने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या माध्यमातून १६ आमदारांना अपात्र करून शिंदे फडणविस सरकार पाडण्याचा विरोधकांचा डाव संपुष्टात आला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

        राज्यपालांचा आघाडीला बहुमत चाचणीसाठी बोलावण्याचा निर्णय जरी चुकीचा असला तरी राज्यपालांद्वारे भाजपच्या पाठिंब्याने शिंदे यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण देण्याचा निर्णय योग्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यातच १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिका प्रलंबित असताना निवडणूक आयोग चिन्हाबाबत निर्णय घेऊ शकतो. असाही निर्णय दिल्याने संपुर्ण विरोधक चित झाले असल्याचे ते म्हणाले.

       सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला न्याय मिळाला असुन आतातरी घटनेचा सन्मान विरोधकानी करावा व सरकारवर घटनाबाह्य असल्याची टीका टाळावी असे मत व्यक्त केले.

       भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या वतीने सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या मार्गदर्शनामध्ये भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.