दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच शिरुर लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नुकतेच भाजपला रामराम ठोकलेले खेड आळंदी विधानसभेचे भाजपचे समन्वयक अतुल देशमुख आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, खेड आळंदी विधानसभेचे भाजपाचे समन्वयक अतुल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. भाजपाला रामराम केल्यानंतर आज अतुल देशमुख हे पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती आहे.
तसेच आज संध्याकाळी पाच वाजता अतुल देशमुख हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. अतुल देशमुख हे उत्तर पुणे जिल्ह्यातील भाजपाचे मोठे नेतृत्व आहे. मात्र आता ते भाजपाला रामराम करत अमोल कोल्हेंच्या प्रचारात उतणार असल्याची माहिती समोर आले आहे. त्यामुळे लोकसभेच्या रणधुमाळीत अमोल कोल्हेंनी हा भाजपला मोठा धक्का दिला आहे.
भाजपातील अंतर्गत कुरघुडी आणि आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याशी असलेल्या संघर्षामुळे अतुल देशमुख यांनी भाजपला रामराम केला. ज्या पक्षात काम करतो तेच आपला विचार करत नसल्याची भावना व्यक्त करत भाजपाच्या सर्व पदांचा राजीनामा देत आम्हीच तुम्हाला सोडतोय अशी थेट भुमिका घेत अतुल देशमुख यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती.