“सैरभैर जनता या पक्षाला मतदान करावं, की त्या नेत्याला मतदान करावं,या वैचारिक गोंधळात सामान्य जनता अडकली आहे.कुणीच कुणाचा वाली नाही.जे नेते ज्या पक्षाचे आहेत,तो त्याच पक्षाचे उद्या राहतील का याचाच भरवसा नसल्यामुळे मतदारात संभ्रम आहे.
जणूकाही छोट्या मोठ्या राजकीय नेत्यांनी व पक्षांनीच देश वाटून घेऊन जनतेला महागाई व बेरोजगारीमूळे भिकेला लावून जनतेवर कर्जाचा माउंट एव्हरेस्ट करुन ठेवलाय.
अशा अवस्थेत ईव्हिएम वरच निवडणूका घेण्याचा अट्टाहास या व्यवस्थेत केल्यामुळे अब की बार ४०० पारचे स्वप्न साकार होणार काय?हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे.
पण तरी सुद्धा मतदाराने जागृत राहूनच मतदान केले पाहिजे.ज्यांनी दहाव्या अनुसूचिच्या पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केले आहे अशांना तर मतदान करूच नये, शिवाय जे 10/ 15 / 20 / 25 / 40 वर्षांपासून संसदेत बसून आहेत,ज्यांना संविधानातील आपल्या हक्क व कर्तव्याची ओळख सुद्धा झाली नाही,जे जनतेला गृहीत धरून चालतात अशांना कायमचे घरी बसविण्यासाठी सुद्धा मतदाराने विचार करावा.
म्हणजे नवीन युवा पिढीला कायदे बनविण्याची संधी मिळेल. साठी बुद्धी नाठी मूळे देश सुद्धा साठ वर्षानंतर वार्धक्याकडे झुकलेला दिसत आहे.
म्हणून जास्तीत जास्त मतदारांनी आपल्या सदसदविवेक बुद्धीचा वापर करून, जातीचा, धर्माचा,लिंगाचा विचार न करता केवळ तो संविधाननिष्ठ आहे का? तो न्यायदेवतेचा सन्मान करणारा आहे का? त्याच्यावर कोणत्याही न्यायालयात खटला चालू आहे का? गेल्या 5 /10 वर्षातला त्याचा अनुभव पाहूनच मतदान करावे.
राष्ट्रीय नेता असो किंवा प्रादेशिक नेता असो त्याच्या आमिषला भुलथापेला बळी न पडता निष्पक्षपणे मतदान करावे…
कारण आपल्याला कोणताही पक्ष,कोणताही नेता, येणाऱ्या भयानक संकटातून वाचवू शकत नाही.तर आपल्याला केवळ संविधानच वाचवू शकते. म्हणून मतदार राजा हा संविधानातूनच जागृत झाला पाहिजे.इतर कोणताही उपाय नाही….