
दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर येणाऱ्या भाविकांसाठी श्री मार्तंड देवसंस्थान समितीने ‘वस्त्रसंहिता’ (ड्रेस कोड) लागू केली आहे. त्यानुसार, तोकडे कपडे परिधान करणाऱ्या भाविकांना गडावर प्रवेशबंदी असेल.
जेजुरीचा खंडोबा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गडावर दररोज हजारो भाविकांची गर्दी असते. याशिवाय वर्षभरात खंडोबाच्या सात लहान-मोठ्या यात्रा जेजुरीत भरतात. यात्रा कालावधीमध्ये तीन ते चार लाख भाविक जेजुरीत देवदर्शनासाठी येत असतात. या भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
श्री मार्तंड देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त अभिजित देवकाते, विश्वस्त ॲड.पांडुरंग थोरवे, राजेंद्र खेडेकर, मुख्य व्यवस्थापक आशिष बाठे, सतीश घाडगे, विलास बालवडकर यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबाबतचे फलक गडावर लावण्यात आले आहेत.
“या’ पेहरावास मनाई
‘शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट, फाटलेल्या जीन्स, हाफ पॅन्ट (बर्मुडा) असा पेहराव करण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे,’ असे मुख्य विश्वस्त अभिजित देवकाते यांनी सांगितले. जेजुरीचा खंडोबा हा नवसाला पावणारा देव म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी अनेक तरुण-तरुणी खंडोबा गडावर देवदर्शनासाठी येतात.
मात्र, अनेकांचा पेहराव भारतीय संस्कृतीला साजेसा नसतो. काहीजण गडाच्या परिसरामध्ये असणाऱ्या बागेत विचित्र पद्धतीने वागताना यापूर्वी आढळून आले आहेत. देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना समज देऊन सोडले आहे. आता या निर्णयाचे सर्वांना काटेकोर पालन करावे लागणार आहे.”