वाचनाने बुद्धीवरील मळभ दूर होवून बुद्धी प्रगल्भ होते :- प्रदीप बोरसरे…

     सुधाकर दुधे 

सावली तालुका प्रतिनिधी 

            वाचनाने बुद्धीवरील मळभ दूर होवून बुद्धी प्रगल्भ होते. वाचनाने ज्ञान समृद्ध होऊन जगाच्या स्पर्धेत टिकून राहता येते. वाचनाने दीर्घायुष्य वाढते आणि आनंदी जीवन जगता येते. वाचानाप्रती ज्ञानलालसा जोपासली पाहिजे. जीवनदृष्टी प्राप्त करण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही. असे प्रसिध्द साहित्यिक प्रमोदजी बोरसरे यांनी ‘वाचक लेखक संवाद’ कार्यक्रमप्रसंगी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले. 

           भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविध्यालय सावली येथे ग्रंथालय विभाग, भाषा विभाग व रा से यो विभागाच्या वतीने महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ ए चंद्रमौली यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवाडा’ राबविण्यात आला.

           या अंतर्गत वाचन कौशल्य कार्यशाळा, आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे अध्यक्ष डॉ. ए टी खोब्रागडे यांनी ‘विध्यार्थ्यानी आपल्या शैक्षणिक जीवनात विविध प्रकारचे वाचन साहित्य वाचले पाहिजे व ज्ञानसमृद्ध झाले पाहिजे’ असे मनोगत व्यक्त केले.

           पंधरवाड्यादरम्यान ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शन भरवून विधार्थ्याना ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या ग्रंथसंपदेचे दर्शन घडविले. यामध्ये कथा, कादंबरी, नाटके, प्रवासवर्णने, आत्मचरित्र, स्पर्धा परीक्षांची पुस्तके तसेच इतरही संदर्भ ग्रंथ ग्रंथ प्रदर्शनी भरविण्यात आले.त्यानंतर सामुहिक वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला.त्यामध्ये विद्यार्थ्यांनी ग्रंथ प्रदर्शनात ठेवण्यात आलेली ग्रंथ आवडीने निवडून सामुहिक वाचन कार्यक्रमात सहभाग दर्शविला. 

         आपले ग्रंथालय व परिसर स्वच्छ राहावे या हेतूने प्रेरित होऊन ग्रंथालय परिसर स्वच्छ करण्याकरिता बहुसंख्य विध्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग दर्शविला.

         पंधरवाडा अंतर्गत विविध उपक्रमे राबविण्याकरिता कार्यक्रमाचे समन्वयक प्रा दिलीप सोनटक्के, ग्रंथालय प्रमुख यांच्यासह डॉ.राम वासेकर, प्रा.संगानंद बागडे, प्रा. प्रशांत वासाडे, प्रा.देव वाताखेरे, प्रा. संदीप देशमुख, डॉ. प्रेरणा मोडक, डॉ.डी.एच.उराडे, प्रा.सचिन वाकडे, प्रा.मुकेश निखाडे व इतर प्राध्यापक मंडळी आणि बहुसंख्य विधार्थ्यानी मोलाचे सहकार्य केले.