मानवतावादी विचारातून घडतात महापुरुष :- डॉ.प्रदीप कदम…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

         आळंदी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचा एकंदरीत संपूर्ण विकास पाहून डॉ. प्रदीप कदम यांनी प्रेम, भक्ती, ज्ञान यांचा उत्तम संगम म्हणजे श्री ज्ञानेश्वर विद्यालय असे व्याख्यानाच्या प्रारंभी कौतुकास्पद वाक्य काढले. श्री ज्ञानेश्वर विद्यालय व जुनिअर कॉलेज, आळंदी देवाची येथे विद्यालयाचा प्रांगणात गुणवत्ता विभागाच्या वतीने ‘विद्यार्थी घडताना’ या उपक्रमांतर्गत व पी.के.फाउंडेशन आयोजित राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ.प्रदीप कदम यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

         यावेळी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, प्राचार्य सुर्यकांत मुंगसे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.            

          डॉ.प्रदीप कदम यांनी माणुसकी हरवत चाललेल्या जगात जाणिवा बोथट झाल्या आहेत, त्यामुळे संवेदना जागृत करण्यासाठी महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तारुण्यातील दिवस सर्वोत्तम बनवण्यासाठी वेळेचा आनंद घेत असताना जबाबदार आणि कठोर परिश्रम देखील केले पाहिजेत.

         ‘उठा जागे व्हा’ आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका तसेच विद्यालयात विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम, कार्यक्रम आदींच्या माध्यमातून संस्कार केले जातात त्यातील एक महत्त्वाचे म्हणजे व्याख्यान. ज्ञानाबरोबर कलात्मक जीवनाचे चित्र काढता आलं पाहिजे असा संदेश त्यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना दिला.          

          स्वामी विवेकानंद यांच बालपण, भविष्यात त्यांनी जोडलेली माणसांची मांदियाळी, दुसऱ्यांच्या वेदना कमी करण्याचे काम त्याचबरोबर मृदंग, तबला, शास्त्रीय गायन, उत्तम भाषण तसेच शिकागो धर्म परिषदेत सातव्या क्रमांकाचे भाषण करणारे स्वामी विवेकानंद यांनी बंधू आणि भगिनींनो या शब्दांनी व्याख्यानाची सुरुवात करताच सर्व श्रोत्यांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात ज्यांना मानवंदना करत शुभेच्छा दिल्या अशा सर्वगुणसंपन्न स्वामी विवेकानंदाच्या जीवनातील प्रसंग मांडून विद्यार्थ्यांच्या अंगावर शहारे उमटविले.