रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
चिमूर:-
भारतात नव्हे तर जगातच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रसिद्ध आहे. वाघांची पंढरी म्हणून ख्याती आहे. ताडोबात देशी व विदेशी पर्यटकांची वाघांना बघण्यासाठी उत्सुकता असते. भारतरत्न सचिन तेंडुलकर तर वाघांना बघण्यासाठी मुक्कामी असतात. दिवसेंदिवस पर्यटनात वाढ होताना दिसत आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या गावात मोठ्या प्रमाणात पर्यटन गेट असल्याने पर्यटकांची मोठ्या प्रमाणात जंगलात वर्दळ असते. बिबट, हरिण, रानडुक्कर, चितळ, ससा, नीलगाय, अस्वल या प्राण्यांपेक्षा वाघाला पाहण्याची पसंती सर्वांत जास्त असते. ताडोबातील कोअर झोन व बफर झोनमध्ये पर्यटन सुरू आहे. त्याचबरोबर आता प्रादेशिक वनविभागातसुद्धा पर्यटन गेट सुरू आहे. त्यामुळे जंगलात मोठ्या प्रमाणात पर्यटक व गाड्यांची संख्या वाढली आहे. यातील अनेक पर्यटक जंगलातील नियम पाळत नाहीत. यामुळे वाघ जंगल सोडून नागरी वस्तीत येऊ नये, यासाठी जंगलात अनेक गाड्या पर्यटकांना घेऊन जातात. शेकडो गाड्यांच्या रांगाच रांगा वाघांना बघण्यासाठी लागत असतात. वाघांना बघण्यासाठी व पर्यटकांना खूश करण्यासाठी जिप्सी जवळ नेणे, पानवठ्याच्या जवळ गाडी लावणे व वाघांचा मागोवा घेणे असे प्रकार ताडोबामध्ये नवीन नाही. जंगलातील प्राण्यांची सवय आता बदलत चालली आहे.
वाघांचे जिप्सीच्या जवळून जाणे, जिप्सीला चाटणे, जिप्सीच्या समोर येणे या सवयी तशा पाळीव प्राण्यांच्या आहेत. मात्र आता वन्यप्राणीही तसे करताना दिसत आहेत. जंगलातील प्राण्यांमध्ये पाळीवपणा तर येत नाही आहे ना, असा प्रश्न पडला आहे. जंगली प्राण्यांना जंगलात मानव वारंवार दिसत असल्याने जंगली प्राण्यांना मानवांची भीती वाटत नाही. जंगलातील वाघ, बिबट, अस्वल, ससा, चितळ, नीलगाय हे प्राणी मानवाला घाबरत नाही.
मानवाने जंगलात हस्तक्षेप वाढविला तर कदाचित भविष्यात याचे गंभीर परिणाम मानवासोबतच प्राण्यांनाही भोगावे लागतील. जंगलात जर मानवाचा हस्तक्षेप वाढविला तर जंगलातील प्राण्यांना फिरण्यासाठी व भ्रमण करण्यासाठी जागाच राहणार नाही. जंगलातील शांतता भंग होईल.
जंगलातील अन्नसाखळी व प्रजनन क्षमतेवरसुद्धा खूप परिणाम होईल. जंगलाजवळील गावात मोठ्या प्रमाणात मानव – वन्यजीव संघर्ष पेटलेला आहे. तो कमी करणे गरजेचे आहे. वनविभाग मानव व वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. मानवाचा जंगलावरील अवलंबन कमी करण्यासाठी वनविभाग विविध उपक्रम राबवित आहे. तरीही पाहिजे तसे फलित झालेले नाही. मानव व वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सक्षम उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.
ताडोबा राष्ट्रीय उद्यान पर्यटन गेटची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र दिवसेंदिवस दिसत आहे. जिप्सीची संख्या वाढली, पर्यटकांची संख्या वाढली म्हणजेच सरळसरळ मानवाचा जंगलात मयदिपेक्षा अधिक हस्तक्षेप वाढला आहे. वाघावर आपण लाखो रुपये कमवित आहोत, पण वाघांच्या संवर्धनासाठी कुठे तरी कमी पडत आहोत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात बफर व कोअर झोन आहेत. दोन्ही झोनमध्ये सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात मोठ्या प्रमाणात जिप्सी चालतात. सोबतच व्हीआयपी कोट्यातूनही मोठ्या प्रमाणात गाड्या जात असतात. गाड्या इतक्या असतात की जंगलालासुद्धा जत्रेचे स्वरूप येत आहे. हे प्रकार योग्य आहे काय, असा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे.