प्रितम जनबंधु
संपादक
नागपूर :- पत्रकारांच्या पाल्यांना रोजगाराची संधी मिळावी, पत्रकार कल्याणकारी महामंडळ निर्माण करण्यात यावे, रेडीओ, टीव्ही आणि डिजिटल मीडियात काम करणाऱ्या मंडळींना श्रमिक पत्रकार संबोधण्यात यावे, पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, पत्रकारांसाठी गृहनिर्माण वसाहत निर्माण करून प्रत्येक जिल्ह्यात १०० घरांची निर्मिती करण्यात यावी, दहा वर्षे पूर्ण केलेल्या पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावे, यासह विविध 15 मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी `व्हॉईस आॕफ मीडिया’ च्या वतीने येत्या १३ डिसेंबरपासून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान यशवंत स्टेडियम येथे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या लाक्षणिक उपोषणात `व्हॉईस ऑफ मीडिया’ चे राज्यातील शेकडो पत्रकार सहभागी होणार आहेत.
18 आणि 19 नोव्हेंबरला बारामती येथे `व्हॉईस आॕफ मीडिया’ चे राज्य शिखर अधिवेशन पत्रकारांच्या भरगच्च उपस्थितीत पार पडले. सामाजिक बांधिलकी जोपासून विविध प्रसार माध्यमांत पत्रकारीता करणारे पत्रकार अलीकडे अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत. त्यामुळे समस्याग्रस्त पत्रकारांना शासनाकडून न्याय मिळावा हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून पत्रकारांच्या न्याय हक्कांच्या 15 विषयांवर चर्चा होऊन आवाजी मताने ठराव पारित करण्यात आले. या ठरावांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 7 डिसेंबरपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशन काळात लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार येत्या १३ डिसेंबरपासून यशवंत स्टेडियम येथे `व्हॉईस आॕफ मीडिया’च्या पत्रकार हल्लाविरोधी समितीचे राज्य अध्यक्ष संदीप महाजन, व्हॉईस आॕफ मीडिया वर्धाचे जिल्हाध्यक्ष किशोर कारंजेकर यांच्यासह अनेक पत्रकार पदाधिकारी लाक्षणिक उपोषणास प्रारंभ करणार असून दररोज राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
`व्हॉईस आॕफ मीडिया’ राज्य कार्यकारिणीचे प्रमुख आनंद आंबेकर, सुनील कुहीकर, विदर्भ अध्यक्ष मंगेश खाटीक हे या उपोषणाच्या लढ्याची तयारी करीत आहेत.
लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीचा हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून पत्रकारांच्या हितासाठी व्हॉईस आॕफ मीडियाचे राज्यभरातील पदाधिकारी लाक्षणिक उपोषण करणार आहेत. पत्रकारांच्या हितासाठी `व्हॉईस आॕफ मीडिया’च्या सरदारांनी अनेक वेळा उपोषणाचे हत्यार उपसले होते ज्याला नेहमीच यश आले आहे.
या मागण्या शासनाने गांभीर्याने घ्याव्यात, अशी मागणी राज्यातील सर्व पत्रकारांतून होत आहे. यानिमित्ताने हिवाळी अधिवेशनात पत्रकार एकतेचे चित्र शासन आणि समाजासमोर दिसणार आहे.
सबब आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन `व्हॉईस आॕफ मीडिया’चे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे आणि प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी केले आहे.